मुंबई Uddhav Thackeray : मुंबईतील सहा जागांसह ठाणे, नाशिक, धुळे, भिंवडी, दिंडोरी, पालघर आणि कल्याण या ठिकाणी पाचव्या टप्पात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. मोदी पंतप्रधान झाल्यापासून फक्त गुजरात गुजरात असं करत आहेत आणि माझ्या मुंबईला मोदींनी भिकारी केलंय, असं जोरदार टिकास्त्र उद्धव ठाकरेंनी मोदींवर डागलं.
मग इथल्या भूमिपुत्रांनी करायचं काय : या सभेत पुढं बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशात असं कुठलं राज्य नाही की, ज्यांनी केवळ 17 दिवसांत फिल्ड हॉस्पिटल तयार केलं होतं. चीननं 17 दिवसांत फिल्ड हॉस्पिटल केलं. त्यानंतर महाराष्ट्रानं कोरोना काळात फक्त 17 दिवसांत फिल्ड हॉस्पिटल तयार केलं होतं." तसंच आपलं सरकार गद्दारी करुन पाडल्यानंतर या सरकारनं पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते हॉस्पिटल पाडलं आणि ती आपल्या मोक्याची जागा बुलेट ट्रेनसाठी म्हणजे गुजरातच्या घशात घातली. तुम्हाला सगळं गुजरात गुजरात करायचं आहे? मग इथला माझ्या भूमिपुत्रांनी करायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारला.
पालिकेतील एफडी तोडायला निघालात : शुक्रवारी मोदींनी म्हटलं की, मी मुंबईला असं करेन तसं करेन पण तुम्ही मुंबईला भिकारी करताय,असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केला. मुंबई महापालिकेच्या 90 हजार कोटीच्या एफडी होत्या. त्या आता तुम्ही तोडायला लागलात. 5000 कोटी तुम्ही एमएमआरडीएला द्यायला निघालात. म्हणजे संपूर्ण योजना ही सरकारची आणि भार मात्र मुंबई महानगरपालिकेवर देण्यात येत आहे. मग आम्ही तुम्हाला काय म्हणून मतं द्यायची? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आरोपीचे फोटो मोदींसोबत : घाटकोपरमध्ये आशियातील सर्वात मोठं होर्डिंग्ज हे त्यांच्याच बगलबच्चांनी केलं होतं. त्यांचा फोटो मोदींबरोबर पण आहे. बुधवारी पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करत घाटकोपरमध्ये रोड शो केला. लेझीम, ढोल पथक आणून मोठा भव्यदिव्य रोड शो केला. तुम्ही एवढा मोठा शो कशासाठी केला? त्यांचा काय तिकडं शोक व्यक्त करत होता का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसंच मुंबईच्या त्या रोड शोसाठी किमान पाच ते दहा कोटी खर्च पालिकेच्या तिजोरीतून केलाय, अशी माहिती समोर येतेय. तो सगळा पैसा हा मुंबईकरांचा आहे आणि खर्च मोदी करत आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
जनतेच्या पैशाचा वापर कशासाठी? : मोदी तुम्ही पंतप्रधान जरी असला तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता? निवडणूक आयोग याची दखल घेणार नाही. चार जूननंतर आपण निवडणूक आयोगाला ठेवायचं का, ते बघू. यांचे घरगडी बदलावे लागतील. एक चांगला निवडणूक आयुक्त आपल्याला पहिल्यांदा तिकडं द्यावा लागेल, की जो दूध का दूध पाणी का पाणी करेल. यांच्यामध्ये काय गटारीचं पाणी जरी आलं तरी शुद्ध गंगाजल म्हणून हे पितात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केली.
भाजपाला राजकारणात पोरच होत नाहीत : आपली दहा वर्ष आयुष्यातली गेल्यानंतर आपण यांना मतदान का म्हणून करायचं? गद्दार पोरं कडेवर घेऊन ते सगळीकडे फिरत आहेत. म्हणून मी म्हणतो की भारतीय जनता पक्षाला राजकारणामध्ये पोरच होत नाहीत. इकडं एक अनिल देसाईंसारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे. अनिल देसाई यांचे राज्यसभेचे व्हिडिओ कदाचित तुम्ही पाहिले असतील. पण समोर जो उमेदवार आहे, त्यांचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील, असं म्हणत ठाकरेंनी राहुल शेवाळेंनाही टोला लगावला.
हेही वाचा :