मुंबई Uddhav Thackeray : राज्यात 20 मे रोजी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी लोकसभेचं मतदान पार पडलं. मात्र, त्यावेळी मुंबईतील विविध भागात अतिशय संथगतीनं मतदान सुरु असून, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड तसंच वीज खंडित असे प्रकार घडल्याचे म्हणत याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मतदान करण्याची वाढीव वेळ मिळावी आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत काही आरोपही केले होते. आता या पत्रकार परिषदेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवला आहे.
आयोगानं जिल्हाधिकार्यांकडं मागवला अहवाल : दरम्यान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामावर शंका उपस्थित करत, अनेक मतदान केंद्रावरत पिण्यासाठी पाणी नाही, व्यवस्थित रांगा नाहीत, मतदाराच्या डोक्यावर छत नाही, मतदान केंद्रावर संथगतीनं मतदान सुरु असल्याचे आरोप केले होते. या सर्व आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा अधिकाऱ्याकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळं लवकरच उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तर कारवाईचा बडगा : मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, कल्याण आदी ठिकाणी 20 मे रोजी मतदान सुरु असताना, अनेक मतदार केंद्रावर घोळ दिसून आला तसंच धीम्या गतीनं होणारं मतदान यावरुन उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केले यात काही तथ्य आहे का? अशी परिस्थिती मतदार केंद्रावर होती का? याची शहानिशा आणि पडताळणी केली जाणार आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्या आरोपात काही तथ्य नसेल तर त्यांच्यावर उचित कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
आयोगाची भूमिका पक्षपाती : दरम्यान उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन निवडणूक आयोगानं अहवाल मागवला असून, याबाबत आरोपात काही खरं न आढळल्यास कारवाई होण्याची शक्यता असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता, निवडणूक आयोग हे पक्षपातीपणाची भूमिका निभावत आहे. तसंच केंद्रातील सरकार पडल्यानंतर आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. तर निवडणूक आयोग हे भाजपाच्या कार्यालयामधून चालते भाजपाच्या आदेशानुसारच निवडणूक आयोग काम करत आहे. विरोधी पक्षाला एक न्याय आणि सत्ताधारी पक्षांना वेगळा न्याय, असं कामकाज निवडणूक आयोगाचं असल्याची टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केली आहे.
हेही वाचा :