रत्नागिरी Uday Samant On Sanjay Raut : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी (11 फेब्रुवारी) रत्नागिरीत बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली. यावरच आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उदय सामंत : उदय सामंत म्हणाले की, "पत्रकार परिषद घेऊन जर राष्ट्रपती राजवट लागली असती तर ती संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागली असती. संजय राऊत यांच्या काही गोष्टी गांभीर्यानं घेऊ नये." तसंच मुख्यमंत्र्यांना नाहक बदनाम केलं जातय. मुख्यमंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल पोटशूळ असणं हे आता जनतेलासुद्धा कळायला लागलंय. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्यावर पत्रकार परिषद घेणं हे आमचे संस्कार नाही. गुंड पोसणं आणि पाळणं कोणाची संस्कृती आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे, असंदेखील मंत्री उदय सामंत म्हणाले.
- जनता मुख्यमंत्री शिंदेंनाच पुन्हा निवडणार : पुढं ते म्हणाले की, "कोणत्या अधिवेशनाचा फायदा होतो हे जनता ठरवणार आहे. महाराष्ट्रातील जनतेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा निवडण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्धव ठाकरे गटाची अनेक शिबिरं झाली तरी त्याचा उपयोग होणार नाही", अशी टीकादेखील उद्योगमंत्र्यांनी यावेळी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरही दिली प्रतिक्रिया : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात विचारण्यात आलं असता यावर प्रतिक्रिया देत मंत्री उदय सामंत म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी स्वतः चर्चा केली आहे. मुख्यमंत्री अधिवेशनाच्या बाबतीत सकारात्मक आहेत."
काय म्हणाले होते संजय राऊत : "या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालंय. या राज्याचा गुंडांनी ताबा घेतलाय. त्याच्यामुळं येथे राष्ट्रपती राजवट लावावी, अशी आमची मागणी आहे. विधानसभा बरखास्त करा आणि ताबडतोब निवडणुका लावाव्या. अन्यथा गुंड येथे हैदोस घालतील. महाविकास आघाडी या गुंडगिरी विरुद्ध कोणत्या प्रकारचे आंदोलन करावे? कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा? या संदर्भात महाविकास आघाडी चर्चा करत आहे. या सरकारच्या झुंडशाहीला आणि गुंडशाहीला आव्हान देऊ", असं संजय राऊत म्हणाले होते.
हेही वाचा -