सातारा : "जिथे जिथे भाजपा आणि मिंध्यांचे उमेदवार असतील, ते तण उखडून गुजरात, गुवाहाटीला तडीपार करा, फेकून द्या," असं आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटण तालुक्यातील मल्हारपेठच्या सभेत केलं. एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरीमध्ये आघाडीवर असलेल्या शंभूराज देसाईंचा त्यांनी पालकमंत्री ऐवजी 'लूटमार मंत्री', असा उल्लेख करत जोरदार टीका केली.
आमचा होम मिनिस्टरच गद्दार निघाला : "आमचा होम मिनिस्टरच गहार निघाला. पोलीस यंत्रणेच्या मदतीनं गद्दारांना गुजरातला पळून जायला मदत केली," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंवर केला. "दिवंगत बाळासाहेब देसाईंच्या पश्चात काँग्रेसमध्ये कुणी विचारेना म्हणून ते आपल्याकडं आले. शिवसेनेसोबत बाळासाहेब देसाईंचं ऋणानुबंध होतं, म्हणून त्यांना शिवसेनेत घेतलं. परंतु, हा लूटमार करणारा करंटा निघेल हे माहीत नव्हतं," अशा ठाकरी शैलीत शंभूराज देसाईंचा त्यांनी समाचार घेतला.
गद्दारांची ओझी खांद्यावरून उतरवा : उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी काँग्रेसबरोबर गेलो म्हणून बडखोरी केल्याचं कारण हे गद्दार सांगत आहेत. मग इथल्या लूटमार मंत्र्यांचे आजोबा पूर्वी काँग्रेसमध्येच मंत्री होते ना? हा गद्दारही तिकडेच होता. नंतर कोणी विचारेना म्हणून आपल्याकडं आला. आपणच त्याला मंत्री केलं. शिवसेनाप्रमुखांचा आदेश म्हणून तुम्ही या सगळ्या गहारांची ओझी खांद्यावर घेतली होती. आता मी आदेश देतो की, या गद्दारांची ओझी आता खाली उतरवा."
लूटमार मंत्री तुमच्या सातबाऱ्यावर अदानींचं नाव लावतील : "भाजपानं या गद्दारांसोबत घेऊन मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रकल्प अदानींच्या घशात घातले. परंतु, निकालानंतर ते सगळे प्रकल्प मी परत महाराष्ट्रात आणून दाखवतो. काहीही झालं तरी अदानींना मुंबई गिळू देणार नाही," असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. "या लूटमार मंत्र्यांनी उद्या तुमच्या सातबाऱ्यावर अदानींचं नाव लावलं तर कुणाकडं दाद मागणार?" असा सवालही त्यांनी केलाय.
मिंध्यांना आता कोणी विचारणार नाही : थोडा, फोडा आणि राज्य करा, वापरा आणि फेकून द्या, ही भाजपाची निती असल्याचं सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं अमित शाह सांगून गेलेत. त्यामुळं मिंध्यांना आता कोणी विचारणार नाही. त्यांचा वापर करून झालेला आहे. गुजरातमार्गे गुवाहाटीला गेलेले गद्दार असतील किंवा भगव्याच्या आड येणारे बंडखोर असतील, त्यांना महाराष्ट्र यापुढे गद्दारच म्हणेल."
शिवसेनेची 'कमळा'बाई करणार होता का? : "शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त गद्दारांनी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत. त्यात 'शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही', हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. मग, बाळासाहेबांनी 'शिवसेनेची कमळाबाई करणार', असं म्हटलं होतं का? तसं नव्हतं तर मग तुम्ही शिवसेनेची 'कमळा'बाई करणार होतात का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून केला.
हेही वाचा -