ठाणे : लॉरेन्स बिष्णोई गँगकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (13 ऑक्टोबर) वर्तक नगर पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. तसंच घराबाहेर सुरक्षा वाढवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जवाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगनं स्वीकारल्याची माहिती मिळत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून वर्तक नगर पोलिसांना निवेदन देण्यात आलं. एप्रिल महिन्यात बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आला होता. हा फोन खंडणीसाठी करण्यात आला होता. जर खंडणी दिली नाही, तर कफनची व्यवस्था करावी, अशी धमकी देणारा फोन आव्हाड यांना आला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील घरी असताना अनोळखी नंबरवरून एक फोन आला. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला बिष्णोई गँगचा शार्पशूटर असल्याचा दावा केला होता. याबाबतची सर्व माहिती पोलिसांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे देण्यात आली.
सुरक्षा वाढवण्याची मागणी : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ठाणे शहर उपाध्यक्ष हेमंत वाणी यांनी ठाणे पोलिसांना निवेदन देत सुरक्षा वाढविण्याची मागणी केली. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (12 ऑक्टोबर) गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या असून, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
एप्रिल महिन्यात झाला होता गुन्हा दाखल : जितेंद्र आवाड यांना फोनवरून धमकी देऊन दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हात बिष्णोईच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून खंडणीची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा