पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदार संघातून आज (28 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. तर दुसरीकडं शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळं बारामतीत पुन्हा एकदा काका-पुतण्या यांच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. यावरच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी युगेंद्र पवार यांनी त्यांचे आई, वडील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कण्हेरी मारुतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पवार विरुद्ध पवार लढाई संदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "बारामतीच्या जनतेनं नेहमीच शरद पवार साहेबांवर खूप प्रेम केलंय. देशात कुठंही गेलं तरी बारामती ही पवारांची बारामती म्हणूनच ओळखली जाते. बारामतीच्या जनतेशी असलेलं आमचं नातं हे केवळ प्रेमानं विनलेलं आहे. त्यामुळं ते नक्कीच आम्हाला साथ देतील." तसंच माझ्यासाठी नातेसंबंध खूप महत्त्वाचे आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मारुतीकडं केली 'ही' प्रार्थना : पुढं सुळे म्हणाल्या की,"माझे आजोबा कायम कण्हेरीला यायचे. तसंच शरद पवार हे देखील निवडणूक काळात कायम कण्हेरीच्या मारुतीला नारळ वाढून प्रचाराला सुरुवात करत होते. त्यामुळं ही परंपरा पवार कुटुंबियांनी कायम ठेवली आहे. आज देखील आम्ही ही परंपरा कायम ठेवत कण्हेरी मारुतीचं दर्शन घ्यायला आलोय. बारामतीची जनता ही नेहमीच शरद पवारांसोबत उभी राहिली आहे. आज मी मारुतीकडं माझ्या कुटुंबातील सर्वांना चांगलं आरोग्य मिळूदे, तसंच बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना केलीय."
हेही वाचा -