पुणे Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार उभा राहणार अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. या अनुषंगानं अजित पवार आणि सुनेत्रा पवार दोघंही प्रचार करत आहेत. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : वडगाव बुद्रुकमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "सत्ता कोणाची मक्तेदारी नाही. खाली हात आये है और खाली हात जायेंगे. माझं घर खासदारकीवर चालत नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला, असं आहे. खंडाळ्यावर तुम्ही यायचं नाही, असं मी त्यांना अगोदरच सांगितलंय. त्यांनी (सदानंद सुळे) मतदारसंघात येऊन भाषणं ठोकली तर तुम्हाला चालेल का? संसदेत नवरा जाणार की मी जाणार? नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाऊड नसतं, त्यांना कॅन्टीनमध्येच बसावं लागतं. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? त्यांनी कितीही चांगलं भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये जाऊन मला विषय मांडायचे असतात", असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ भाषण करणाऱ्या अजित पवारांना टोला लगावला.
पुढं त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्रात विरोधी असे 10 खासदार आहेत, तर 38 खासदार हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे खासदार आहेत. त्या 38 पैकी एकाही खासदारानं महागाईचा 'म' देखील काढला का?", असा सवालही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा -