मुंबई Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यंदा पुन्हा विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली असून ते या मतदारसंघातून हॅट्रिक साधन्याच्या प्रयत्नात आहेत. हा मतदारसंघ राज ठाकरे यांच्या मनसेला सोडण्यासाठी यापूर्वी भाजपा आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं होतं. परंतु, राज ठाकरेंनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत, मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असल्यानं या मतदारसंघावर शिंदे गट आणि भाजपाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न चालू आहेत. त्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शनिवारी रात्री या मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आमदार प्रवीण दरेकरही उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही इच्छुक उमेदवारांना आपापल्या विभागात तयारी करण्यास सांगण्यात आलंय. तसंच येत्या एक ते दोन दिवसांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवार निश्चित होणार, असंही सांगण्यात येतंय.
भाजपाचं वर्चस्व : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फार आग्रही असले तरीसुद्धा त्यांच्याकडं फक्त भायखळा मतदारसंघातील आमदार यामिनी जाधव या एकमेव आमदार आहेत. शिवडीमध्ये आमदार अजय चौधरी आणि वरळीमध्ये आमदार आदित्य ठाकरे हे दोन आमदार उबाठा गटाचे आहेत. तसंच कुलाबामध्ये आमदार राहुल नार्वेकर आणि मलबार हिलमध्ये आमदार मंगल प्रभात लोढा हे दोन आमदार भाजपाचे आहेत. तर मुंबादेवी मतदार संघात काँग्रेसचे अमीन पटेल हे एकमेव आमदार आहेत. अशा परिस्थितीत मागच्या 2019 च्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला शिवसेनेपेक्षा जास्त मतं मिळाली होती. तसंच मलबार हिल विधानसभा मतदार संघात भाजपाचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात असून मंगल प्रभात लोढा यांना 90 हजारांच्या पेक्षा जास्त मतं विधानसभेत मिळाली होती व मोठी लीड इथून भेटली होती. या कारणानं आता भाजपा या मतदारसंघावर दावा करत असून देवेंद्र फडवणीस यासाठी पूर्णपणे कामाला लागले असून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांनाही कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
असं आहे आतापर्यंतचं मुंबईतील चित्र : मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून यातील उत्तर मुंबई मतदार संघातून भाजपानं विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करुन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिलीय. उत्तर पूर्व मुंबई मतदार संघातून भाजपानं विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करुन आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिलीय. उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महायुतीकडून अद्याप उमेदवार देणं बाकी आहे. येथून ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता जास्त असून या मतदारसंघातून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीकडून उद्याप या ठिकाणी उमेदवार दिला गेला नाही. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. आतापर्यंत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून केवळ दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात उमेदवार दिला गेला असून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपानं उमेदवार दिल्यास एकनाथ शिंदे यांच्यावर हक्काची अजून एक जागा भाजपाला सोडण्याची नामुष्की ओढवणार आहे.
हेही वाचा :