छत्रपती संभाजीनगर Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रविवारी (7 जुलै) छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी पक्षाचे दिग्गज नेते हजर होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार प्रहार केला. तसंच राज्य सरकारच्या विविध योजनांचे वाभाडे काढले.
भाजपा नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश : "राज्यात सुरु असलेल्या घोषणा निवडणुकीला समोर ठेवून आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र होणार नाही," अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली. "महिलांना योजना लागू करुन मत मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक होती. मात्र, महाराष्ट्राची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक असून जास्तीत जास्त जागा आपण जिंकू," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. "समाजा समाजात फूट पाडू नका, तुम्हाला जर तोडगा काढायचा असेल तर मंत्र्यांना नाही तर थेट जरांगे आणि हाके यांना एकत्र बसवा आम्ही पाठिंबा देऊ," असं देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. या मेळाव्यात भाजपा नगरसेवक तथा माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी इतर चार नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश केला.
सरकारचं शेवटचं अधिवेशन : "अधिवेशनाला सुरुवात झाली. हे या सरकारचं अखेरचं निरोपाचं अधिबेशन आहे. आता आपण यांना घालवायची शपथ घ्यायला हवी. माता भगिनींच्या मतांसाठी डाव टाकून योजना जाहीर करणे सुरु आहे," असा आरोप उद्धव ठाकरे यांनी 'लाडकी बहीण' योजनेवरुन सरकारवर केला. "10 वर्षात इतक्या योजना जाहीर केल्या. अंमलबजावणी कधी केली? शेतकऱ्यांचे पूर्ण वीज बिल माफ करा, थकबाकी सकट वीज बिल माफ करा. यांचा पापाचा घडा भरला आहे, म्हणून हे योजना जाहीर करताय. नुसत्या थापा मारतात, महिलांसाठी योजना आणता आहेत, स्वागत आहे. मात्र, माझ्या युवकांसाठी काय आहे? बेरोजगारांचे तांडे फिरतात, निवडणूक आल्या की भुलवायचं आणि झाल्या की येरे माझा मागल्या असं म्हणायचं, "अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
जातींमध्ये भांडण लावू नका : "माझा महाराष्ट्र आहे, जातीपाती समाजात भांडणं लावून भाजपा मजा मारत आहे. मी सगळ्यांना जाहीर हाथ जोडून विनंती करतो कृपा करा, मी तुमच्यासोबत आहे. आगी लावू नका, तुम्हाला न्याय हक्क मिळेल. मात्र, आपापसात भांडू नका, राजकारणातील घर जाळा, त्यांचं राजकीय वजन खालसा करा. मात्र राजकारण्यांना बोलावण्या पेक्षा जरांगेंना बोलवा हाकेंना बोलवा, मराठा, ओबीसी, धनगर सगळे या आणि सरकारला ताकद दाखवा, उद्याच्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढा व त्याला माझा पाठिंबा आहे. फक्त कोपऱ्याला गुळ लावू नका. आरक्षणाची टक्केवारी राज्य सरकार वाढवू शकत नाही हा केंद्राचा अधिकार आहे. विधानसभेत ठराव मांडा आमचा पाठिंबा आहे, लोकसभेत ठराव मांडा आमचा पाठिंबा आहे. मात्र, फोडाफोडी करु नका. जरांगे, ओबीसी, माझं सगळ्यांना आवाहन आहे, एकमेकात भांडू नका. मराठी माणसांना आपापसात भिडवणं सुरुय, योजना जाहीर करा, पण आरक्षण कधी देणार ते ही सांगा," असा जाब उद्धव ठाकरे यांनी विचारला.
हा विजय तुमचा नाही : "लोकसभा निकालानंतर आज बाहेर पडतोय. आपण हक्काची संभाजीनगरची जागा गमावली, कारण काहीही असेल हार झाली आहे, अती आत्मविश्वास नडला का? असेल कदाचित. खैरे निष्ठेनं राहिले म्हणून उमेदवारी देऊन आदर केला. गेल्या वेळी मशालचा प्रचार करायला उशीर झाला. आपल्याला उशिरा निवडणूक चिन्ह दिलं. तुम्ही मिळवलेला विजय माझा पक्ष चोरुन मिळवलेला विजय आहे. अरे चोरट्यानो भामट्यांनो हा तुमचा विजय नाही. असाच खेळ राष्ट्रवादीबरोबर केला," असं म्हणत ठाकरे यांनी भुमरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "बाळासाहेब यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत आहे म्हणून त्यांचा फोटो कुणीही वापरु शकतो. आपण अनेक कामं केली तरी आपण कुठं कमी पडलो बघा, लोकांना विचारा, अनेक लोक मला म्हणाले उद्धवजी आम्ही तुम्हाला वोट देणार होतो. मात्र आम्ही चुकून धनुष्याला वोट दिलं. मात्र, आता हा संभ्रम संपला आहे," असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा :