मुंबई- शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राजेंद्र गावित हे पालघरचे विद्यमान खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर गावित नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी आज मुंबईतील भाजपा कार्यालयात भाजपात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गावित यांच्या भाजपा प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, " डॉक्टर राजेंद्र गावित हे पुन्हा एकदा भाजप पक्षात आलेले आहेत. त्यांचा जो काही जुना मंत्री व आमदार म्हणून अनुभव आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्रात अधिक प्रमाणात करता येईल. त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही पालघरचे उमेदवार बदलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून त्यांना शिवसेनेतून भाजपामध्ये आणलं आहे."
धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोध- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत भाजपा-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस यांचा मुस्लिम व अल्पसंख्याक लोकांना फायदा झाला आहे. काँग्रेस म्हणते देशात पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. तर मोदी म्हणतात पहिला अधिकार गरिबांचा आहे. काँग्रेस भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोध केला होता."
यावर उद्धव ठाकरे गप्प का- खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या घरी पोहचल्या होत्या. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, " हा भावनिक मुद्दा आहे. सुप्रिया सुळे या भावनिक राजकारण करत आहेत. अजित पवार यांच्या पाठीशी आई आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी 26/11 हल्ल्यावरून माजी विशेष सरकारी वकील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, "विजय वडेट्टीवार यांची चौकशी करा. आम्ही उज्वल निकम यांच्यासोबत आहोत. काँग्रेसच्या आरोपावर उद्धव ठाकरे गप्प का? बाळासाहेब ठाकरे यांनी उज्वल निकम यांचं अभिनंदन केलं होतं."
आज माझी पुन्हा घरवापसी- खासदार राजेंद्र गावित यांनी म्हटले, " मला भाजपामध्ये पुन्हा प्रवेश दिल्याबद्दल भाजप नेत्यांचा आभारी आहे. २०१८ मध्ये मी भाजपामध्ये प्रवेश केला. अत्यंत चुरशीची अशी ती निवडणूक होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पालघर जागेसाठी आग्रह धरला. मी शिवसेनेत गेलो. त्यानंतर मी शिंदे यांच्यासोबत राहिलो. आता फडणवीस यांनी मला विनंती केली की आदिवासी विभागासाठी माझे काम आहे. ते पाहता त्यांनी मला सांगितल्यानंतर आज माझी पुन्हा घरवापसी झाली आहे. एकनाथ शिंदे यांनीसुद्धा मला भरपूर मदत केली आहे."
हेही वाचा-