पुणे Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतलाय. पुढील पाच वर्षांसाठी ते अभिनय तसंच कला क्षेत्रात काम करणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. शिरुर लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात अनेक कामं केली आहेत, अनेक प्रकल्प मंजूर करुन आणले आहेत. माझ्या मतदार संघात कामं सुरु असलेले व काम सुरु होणारे प्रकल्प पूर्ण करुन घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार असून त्यासाठी पुढील पाच वर्ष मालिका क्षेत्रातील अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय मी घेत असल्याचं यावेळी कोल्हेंनी सांगितलंय. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.
विकास कामांचा पाढाच वाचला : यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्न गेल्या पाच वर्षात मार्गी लावले आहेत. पुणे-नाशिक हायवे असेल, तळेगाव-चाकण-शिक्रापूर हायवे असेल, पुणे-नगर हायवे असेल यासाठी आपण तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून आणलाय. याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लावणं गरजेचं आहे. तसंच पुणे-सोलापूर रोड वरील जी वाहतुक कोंडी होते ती सोडविण्यासाठी रवी दर्शन चौकापासून यवत पर्यंतच्या एलिव्हेटड कॉरिडॉरचा DPR नॅशनल हायवेला सादर केलाय. त्याच्या मंजुरीची आपण वाट पाहतोय. तसंच इंद्रायणी मेडीसिटी सारखा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प हा आपण शिरुर लोकसभा मतदार संघात आणतोय आणि आदिवासी भागामधल्या तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय वन औषधी संशोधन केंद्राच्या प्रकल्पाचा DPR तयार करुन आयुष मंत्रालयाला सादर केलाय. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी आहे, असं म्हणत कोल्हेंनी त्यांनी केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला.
अभिनय क्षेत्रातून पाच वर्षांचा ब्रेक : पंधरा वर्षात एका व्यक्तीला संधी दिल्यानंतर पंधरा वर्षात मतदारसंघात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता. मात्र माझ्या अवघ्या पाच वर्षात हे सर्व प्रोजेक्ट आले असून मार्गीही लागले आहेत. या सर्व बाबी प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देता येणं शक्य नाही. त्यामुळं हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मालिका विश्वातून अभिनयाला पाच वर्षांसाठी ब्रेक द्यावा लागणार आहे. मला माहिती आहे, अनेक चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते. परंतु, ज्या शिरुर लोकसभा मतदार संघातील मायबाप जनतेनं माझ्यावर विश्वास टाकण्याचं ठरविलंय. त्यांच्यासाठी मला मालिका विश्वातील अभिनयातून पाच वर्ष ब्रेक घ्यावा लागेल, असं यावेळी कोल्हे म्हणाले.
हेही वाचा :