शिर्डी (अहिल्यानगर) : काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात प्रभावती घोगरे यांना मैदानात उतरविलं. प्रभावती घोगरे यांच्या उमेदवारीनं शिर्डीतील विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचा खरा राजकीय करिष्मा दिसून आला होता. काही वर्षांपासून गणेश कारखाना विखे पाटील यांच्या ताब्यात होता. मात्र, गेल्या वर्षी विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीत विखेंच्या पॅनल विरोधात उडी मारली. तेव्हा विखेंचे परंपरागत राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांची मोठी रसद मिळाली. पण प्रचाराच्या प्रभावती घोगरे यांचे कोल्हार गावातील भाषण चांगलेच गाजले.
प्रभावती यांच्या उमेदवारीनं विखे-पाटील यांना शह- प्रवरा साखरपट्ट्यात अर्थात राहाता-शिर्डीत पन्नास वर्षांपासून राजकीय गड शाबूत ठेवलेल्या विखेंना प्रभावती घोगरेच आव्हान देऊ शकतात, असा विश्वास काँग्रेस आणि पर्यायानं महाविकास आघाडीला झाला. त्यामुळे लोणी खुर्द गावच्या लोकनियुक्त सरपंच असलेल्या घोगरे यांना विखेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. एकीकडे सुजय विखे हे बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरच्या चिरेबंद गडावर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार चाल करून जात आहेत. दुसरीकडं थोरातांनीही शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात प्रभावती घोगरे यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्र अवलंबिले आहे. एकूणच प्रभावती घोगरे यांच्या उमेदवारीनं थोरातांनी विखेंना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोण आहेत प्रभावती घोगरे?- लोणी-शिर्डी परिसरात प्रभावती घोगरे यांचा मोठा राजकीय वारसा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कट्टर रोधक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रभावती घोगरे या शिर्डी विधानसभा मतदातसंघाचे पहिले आमदार चंद्रभान घोगरे यांच्या स्नुषा आहेत. त्या उच्च शिक्षित असून विखेंच्या प्रवरा परिसरातील लोणी खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या काळात घोगरे यांनी विखेंवर तुफान टीका केली होती. लोणी-प्रवरा परिसरातील विखेंच्या ताब्यात असलेल्या या सर्व संस्था केवळ विखेंनी स्थापन करत वाढवलेल्या नसून त्यात सासरे चंद्रभान घोगरे, धनंजय गाडगीळ यांचा तेवढाच महत्वाचा वाटा असल्याचं भाषणात नमूद केलं होते. मात्र, काळाच्या ओघात विखेंनी या सर्व संस्थांवर स्वतःच्याच कुटुंबाची दावेदारी करत इतरांना कसे अदखलपात्र केले, याचा पाढा आपल्या खुमासदार शैलीत केला.
- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बाळासाहेब थोरातांकडून संगमनेरची रसद ही घोगरे यांच्यासाठी शिर्डी मतदारसंघात पुरविण्यात आल्यास नवल वाटायला नको. गणेश कारखाना ताब्यात घेताना थोरात-घोगरेंची साथ घेणारे विवेक कोल्हे घोगरेंना मदत करणार की तटस्थ राहणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा-