नवी दिल्ली Piyush Goyal On Rahul Gandhi : लोकसभा निवडणूक 2024 च्या अंतिम निकालापूर्वी एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपाला 300 च्या आसपास जागा दाखवण्यात आल्या होत्या. त्यानंतर शेअर बाजाराच्या निर्देशांक वधारला. परंतु, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी (4 जून) शेअर मार्केट अचानक कोसळलं. त्यामुळं अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. याच मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
शेअर बाजाराच्या निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसंच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामण यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर आता भाजपा नेते पीयूष गोयल यांनी जोरदार पलटवार केलाय.
काय म्हणाले पीयूष गोयल? : यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना पीयूष गोयल म्हणाले की, "लोकसभा निवडणूकीमध्ये विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळं राहुल गांधी निराश झालेत. त्यामुळंच ते आमच्यावर बेछूट आरोप करताय. आज भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. संपूर्ण जग भारताला सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून स्वीकारतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळं राहुल गांधी नाराज झालेत. त्यामुळंच परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत", असा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारच्या काळात पाच पटीनं शेअर बाजारात वाढ- पुढं ते म्हणाले की, "मागील 60 वर्षांत भारतीय बाजारपेठेनं जेवढे मार्केट कॅप गाठले, त्यापेक्षा पाच पटीनं जास्त वाढ मोदी सरकारच्या कार्यकाळात झालीय. या सर्वांचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना झाला. आज किरकोळ गुंतवणूकदार देखील फक्त दुरुनच बाजार पाहात नाही, तर गुंतवणूक करतात. त्याचा थेट फायदाही घेतात. यूपीएच्या काळात पीएफआयची होल्डिंग 21% होती, तर ती आज 16% वर आलीय. परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी झालाय. भारतीय गुंतवणूकदारांचं प्रमाण वाढलंय. ज्या दिवशी एक्झिट पोल आला, त्या दिवशी विदेशी लोकांनी मोठ्या दरानं शेअर खरेदी केली. भारतीय गुंतवणूकदारांनी मोठ्या भावानं विक्री करून नफा कमावला", असा दावाही गोयल यांनी यावेळी केला.
राहुल गांधींचा काय आहे आरोप- गुंतवणूकदारांचे सुमारे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, " हा देशाच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर होतील तेव्हा शेअर बाजार गगनाला भिडेल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. पंतप्रधान मोदींनीही शेअर बाजारातील विक्रमी वाढ होईल असा दावा करत शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही शेअर बाजारातील तेजीबद्दल बोलले होते."
हेही वाचा -
- वाराणसीतून पंतप्रधान मोदी, तर रायबरेलीतून राहुल गांधी विजयी - Lok Sabha election results 2024
- 'एक्झिट पोल' जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये रणनीती आखण्याकरिता हालचाली सुरू, राहुल गांधी आज घेणार बैठक - Exit Poll 2024
- सावरकर वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांना पुण्याच्या न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स - Rahul Gandhi