सातारा Shashikant Shinde : सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई बाजार समितीतील काही तक्रारीवरुन तांत्रिक माहितीच्या आधारे नव्यानं गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती स्वतः शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात दिली. यावरुन शरद पवार साताऱ्यात आक्रमक झाले असून, दहिवडी इथं माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी यावरुन थेट सरकारला इशारा दिलाय.
राज्य सरकारला इशारा : या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, "शशिकांत शिंदे यांना निवडणुकीत अडविण्याचा व थांबविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात याविरोधात आवाज उठवून संघर्ष करतील." तसंच मुंबई मार्केट समितीतील तक्रारीवरुन शशिकांत शिंदेंना महायुतीतील भाजपाकडून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केलाय. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात संयमानं, लोकशाहीच्या माध्यमानं संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करणार नाही, हे उदाहरण दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर टीका : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न द्यावा, या अजित पवार गटाच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "सातारा जिल्हा देशाचा आगळा वेगळा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिलाय. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या, अशी मागणी होत आहे आणि याचाच आनंद आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे. चव्हाण यांचं स्मारक मुंबईत आहे, संसदेतही चव्हाण यांचा फोटो आहे. अशा अनेक गोष्टी चव्हाण यांच्या कार्याची नोंद व्हावी म्हणून केल्या आहेत. पण हा विषय निवडणुकीचा मुद्दा म्हणून आम्ही केला नाही." यावेळी त्यांनी मोदींवरही टीका केली. "मोदींच्या काळात महागाई वाढली. भारतात 100 पैकी 87 तरुणांना काम नाही. स्वतः काय केलं ते मोदी सांगत नाहीत," असं म्हणत शरद पवारांनी भाजपा सरकार आणि मोदींवर निशाणा साधलाय.
हेही वाचा :