पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये ऑफर दिल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी अस्वस्थ असल्यानं असं विधान करतात. आम्ही गांधी आणि नेहरुंच्या विचारधारेचे आहोत. देशाचे हित नाही, तिथे मी आणि माझे सहकारी नाहीत, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे ऑफर धुडकावली. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणांतील भूमिकेवरूनही शरद पवार यांनी टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका देशाचा आणि जातीचा विचार करतात. एखाद्या समाजाबद्दल वेगळी भूमिका नको. मोदींची भाषणे देशासाठी घातक आहेत. मोदींमुळे देशाची संसदीय लोकशाही संकटात आहे. ३ टप्प्यांतील मतदानानंतर ते अस्वस्थ आहेत. मोदींच्या भूमिकेमुळे देशात ऐक्य राहणार नाही. त्यांनी पंतप्रधान पदाचे तारतम्य बाळगले पाहिजे. आम्हाला नकली म्हणण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला? त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे समाजात ऐक्य राहणार नाही. त्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली नाही." अजित पवार यांच्या टीकेबाबत शरद पवार म्हणाले, "अजित पवार हे बालबुद्धीचे आहेत."
काय आहेत राजकीय प्रतिक्रिया? मोदींच्या ऑफरवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, "सत्तेत येणार नसल्यास भाजपानं मान्य करावं. आमचा दावा खरा ठरत आहे." तर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान मोदींना विश्रांती गरज आहे."
पंतप्रधान मोदींनी काय दिली ऑफर? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील प्रचारसभेत शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, " 4 जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर डुप्लिकेट राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी शरद पवार यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात गटात सामील व्हावे. आमच्या सोबत या. तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील. पुढे ते म्हणाले, " 40-50 वर्षांपासून सक्रिय असलेला इथला मोठा नेता (शरद पवार) बारामती लोकसभेच्या मतदानानंतर चिंतेत आहे.
- नुकतेच शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर राज्यभरात शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
हेही वाचा-