मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपानं उत्तर-मुंबई आणि ईशान्य-मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात अ'मराठी' उमेदवार दिला आहे. मिहीर कोटेचा आणि पियुष गोयल या दोन उमेदवारांना भाजपानं उमेदवारी घोषित केलीय. मात्र, लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊन देखील भाजपाला मुंबईत मराठी उमेदवार मिळत नाहीत अशा परिस्थितीत कोणीतरी सोन्या गोम्या उमेदवार देण्यापेक्षा सुरत लोकसभेप्रमाणं मुंबईमधील दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजपानं विचार करावा, अशी मी त्यांना विनंती करत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि चिटणीस ॲड. निलेश भोसले यांनी सांगितलं.
शासकीय यंत्रणेवरचा ताण आणि खर्च वाचवा : भाजपाला मराठी उमेदवार मिळत नसेल तर त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी. कारण मुंबई उत्तर-पश्चिम मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघात निवडणूक बिनविरोध केल्यास शासनाच्या यंत्रणेवरील येणारा ताण आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तसेच देशहितासाठी आणि करदात्यांच्या पैसा वाचवण्यासाठी भाजपानं सकारात्मक विचार करावा, असंही भोसले यांनी म्हटलंय. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.
आम्ही मराठी उमेदवार दिला : या संदर्भात केशव उपाध्ये म्हणाले की, मुंबईतील भाजपाच्या ज्या तीन जागा आहेत त्या तीन जागांपैकी सर्व जागांवर आम्ही उमेदवार दिले आहेत. उज्वल निकम हे मराठी उमेदवार आहेत ज्यांना आम्ही उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नुकतीच जाहीर केलीय. उरलेल्या जागा या शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळं त्याबाबत आम्ही भाष्य करू शकत नाही. त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भोसले यांच्या प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही.
हेही वाचा -
- उष्णता आणि राजकीय उदासीनतेमुळं महाराष्ट्रात मतांचा टक्का घसरला; अजून काय आहेत कारणं? - Lok Sabha Election 2024
- "स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ कळला नाही तो..."; विनायक राऊतांची नारायण राणेंवर बोचरी टीका - Lok Sabha Election 2024
- पंकजा मुंडेंनी मारली पलटी! म्हणाल्या, "प्रीतम मुंडेंविषयीचं वक्तव्य..." - Pankaja Munde