पुणे BJP workers Attack on Nikhil Wagle : शुक्रवार पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपा युवा मोर्चा, पतीत पावन संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हल्ला करत तीन ते चार ठिकाणी त्यांची गाडी फोडण्यात आली. तसेच महिला कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील बालगंधर्व चौकात 'बांगड्या भरो' आंदोलन करण्यात आलं.
शुक्रवारची घटना दुर्दैवी : यावेळी आंदोलकांनी महायुती विरोधात जोरदार घोषणबाजी केली. यावर शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, शुक्रवारची घटना खूप दुर्दैवी आहे. ही लोकशाही नव्हं तर ही हुकूमशाहीकडं करण्यात आलेली वाटचाल आहे. शुक्रवारचा थरार हा पुणेकरांनी कधीच अनुभवला नव्हता. जो प्रकार झाला तो खून करण्याचा प्रकार होता. माझ्या समोर महायुतीच्या लोकांनी हल्ला केला आणि आमच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण केली. वरच्या मंडळींनी यांना चुकीचे आदेश दिले होते का? असा आमचा आरोप आहे, असं यावेळी जगताप म्हणाले.
अजित पवार पाठवणार व्हिडिओ : शुक्रवारच्या हल्ल्यात अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावर जगताप म्हणाले की, "अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला आहे त्याचा व्हिडिओ आम्ही अजित पवार यांना पाठवणार आहोत. अजित पवार यांना कधीकाळी गुंडगिरी पटत नव्हती. पण आता अजित पवार यांना मुभा देणार का, की आळा घालणार हे पाहावं लागणार."
10 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलय. यामुळं भाजपा कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला असून त्यांनी वागळेंच्या पुण्यातील सभेला विरोध दर्शवला. यातूनच आज त्यांनी वागळेंच्या गाडीवर शाईफेक करत गाडीही फोडली होती. याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 10 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा -