कोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं भरभरून यश मिळवलं. माध्यमांशी खुला संवाद साधत शनिवारी शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मिळालेल्या जागांवर शंका उपस्थित केली. "कमी मतदान असूनही एकनाथ शिंदे-अजित पवारांचे अधिक आमदार कसे? शिंदे आणि अजित पवारांच्या नेतृत्वात 98 आमदार निवडून आले. मात्र दुसरीकडं काँग्रेस पक्षाला 80 लाख मतं पडूनही काँग्रेसचे अवघे 16 आमदार निवडून आले," अशी शंका शरद पवारांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केली.
आकडेवारीवर केली शंका उपस्थित : "यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 80 लाख मतं पडली आणि त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला 79 लाख मतं मिळाली, त्यांच्या आमदारांची संख्या 57 आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला यंदाच्या विधानसभेत 72 लाख मतं मिळाली आहेत. मात्र, पक्षाला जागा मिळाल्या अवघ्या 10 आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला 58 लाख इतकी मतं मिळाले पण त्यांचे 41 आमदार कसे निवडून आले?" असा सवाल उपस्थित करत शरद पवार यांनी संपूर्ण आकडेवारी मांडली.
मतदानाची आकडेवारी जमा करणार : "राज्यात झालेल्या आतापर्यंतच्या निवडणुकीत कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाला यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण असतं. पण राज्यात महायुतीनं मिळवलेल्या यशानंतरही मला महाराष्ट्रात तसं वातावरण दिसत नाही. मात्र, मी कोणत्याही राजकीय पक्षावर भाष्य करणार नाही. कारण ठोस आकडेवारी माझ्याकडं नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी जमा करण्याचा काम करत आहोत," असं सांगत शरद पवारांनी पहिल्यांदाच विधानसभेतील पराभवानंतर माध्यमांसमोर ठोस भूमिका मांडली.
राजकारण थांबणार नाही : "राज्यातील जनतेनं महायुतीच्या पारड्यात मतांचं भरभरून दान टाकत 232 आमदार निवडून दिले, तरीही राज्यातील फोडाफोडीचं राजकारण थांबेल असं वाटत नाही. यावेळच्या निवडणुकीचा अनुभव वेगळा होता. महाविकास आघाडीकडं विधिमंडळात कमी संख्या असली तरी गुणवत्ता असलेले तरुण विधिमंडळांत गेले आहेत. आमदार रोहित पाटील यांच्याबाबत रोहित पवार यांनीच निर्णय घेतला. त्यामुळं ते नाराज आहेत हे खरं नाही. महायुतीकडं बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे, मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत," असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा -