मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? याबाबबत बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याकरिता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुंबईवरून दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
महाविकास आघाडीनं महायुतीला लोकसभेच्या निकालात मोठा धक्का दिला. त्यामुळे एकट्या भाजपाला बहुमताचे लक्ष्य गाठणं शक्य झालं नाही. त्यामुळे भाजपाला बहुमतासाठी एनडीएमधील मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर इंडिया आघाडीकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आजची इंडिया आघाडीची बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे.
शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी केली चर्चा- राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी लोकसभा निकालानंतर प्रतिक्रिया देताना सोमवारी समाधान व्यक्त केलं. निकालामुळे आणखी काम करण्याची प्रेरणा आल्याचं त्यांनी सांगितलं. इंडिया आघाडीकडून बहुमताची जुळवाजुळव सुरू होण्याची शक्यता असताना शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन केल्याची चर्चा होती. त्यावर शरद पवार यांनी नितीश कुमार अथवा चंद्राबाबु यांना फोन केला नसल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा झाली असल्याची सांगत इंडिया आघाडीची बैठक बुधवारी होणार असल्याची माहिती दिली.
सुनेत्रा पवार यांचा पराभव-लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य पणाला लागलं होतं. बारामती लोकसभेच्या निकालात सुप्रिया सुळे यांनी त्यांची नणंद सुनेत्रा पवार यांचा पराभव करत 1 लाख 58 हजार 333 मतांनी विजय मिळविला. या विजयानंतर मतदारांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखील राष्ट्रवादीला पसंती दिल्याचं स्पष्ट झाले.
सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे मानले आभार- खासदार सुप्रिया सुळे यांनी निकालानंतर एक्स सोशल मीडियावर करत मतदारांचे आभार मानले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " सलग चौथ्या वेळेस आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. यावेळेस महाराष्ट्राच्या स्वाभिमान कायम राखण्याची लढाई होती. या अतिशय महत्वाच्या लढ्यात आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज बुलंद करताना मला विजयी केले. अर्थात माझा एकटीचा विजय नसून मतदारसंघातील प्रत्येक स्वाभिमानी मतदाराचा विजय आहे.
हेही वाचा-