सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात जोरदार रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पाटणचे आमदार तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यासह पाटणमधून शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
शक्तीप्रदर्शनाकडे जिल्ह्याचं लक्ष : विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना उमेदवार शक्तीप्रदर्शन करण्यावर भर देतात. मात्र, काही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन टाळले आहे. कराड दक्षिणमधून महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला होता. उद्या (सोमवारी) आमदार पृथ्वीराज चव्हाण देखील साधेपणाने अर्ज दाखल करणार आहेत. कराड उत्तरमधून आ. बाळासाहेब पाटील, साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि पाटणमध्ये सत्यजितसिंह पाटणकरांनी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. पाटणमधून पालकमंत्री शंभूराज देसाई हे मात्र साधेपणाने अर्ज दाखल करणार आहेत.
मकरंद पाटील, शशिकांत शिंदेंचा अर्ज शेवटच्या दिवशी : वाई-खंडाळ्याचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार मकरंद पाटील आणि कोरेगावचे (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदे हे अखेरच्या दिवशी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील आठपैकी माण-खटावमध्ये महाविकास आघाडी आणि कराड उत्तरमध्ये महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.
जिल्ह्यात महायुतीचे पाच तर मविआचे तीन उमेदवार : साताऱ्यातील आठपैकी पाच मतदार संघात महायुतीचे तर तीन मतदार संघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत. सातारा, पाटण, वाई, माण-खटाव आणि कोरेगावच्या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. फलटणमधील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार दीपक चव्हाण यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) आणि आ. बाळासाहेब पाटील (शरद पवार गट), असे तीन मविआचे उमेदवार आहेत.
हेही वाचा -