मुंबई Sanjay Shirsat criticized MVA : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापायला सुरुवात झालीय. तसंच महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातील जागा वाटपावरील नाराजी थांबायचं नाव घेत नाही. मविआत तीन ते चार जागेवरुन तिढा कायम आहे. तर महायुतीतील सात ते नऊ जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, असं असलं तरी "महायुतीत कोणतेही मतभेद नसून सर्वकाही आलबेल आहे," असं शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
काय म्हणाले संजय शिरसाट? : संजय शिरसाट यांनी आज (7 एप्रिल) पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसंच यावेळी बोलत असताना त्यांनी मविआवर निशाणा साधत जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, "भिवंडी आणि सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमधील वाद आणि मतभेद समोर आले आहेत. मविआत अजूनही जागावाटपाबाबत एकमत होत नाहीये, त्यामुळं लोकसभा मतदानापर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही." तसंच "नाना पटोले यांनी पहिल्यांदा स्वतः कडं पहावं आणि मग दुसऱ्यावर टीका करावी," असा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम : "महायुतीत नाशिकची जागा कोणाला मिळणार हे अजून निश्चित झालेलं नाही. मात्र, नाशिकसाठी आम्ही आग्रही आहोत. नाशिकची जागा हेमंत गोडसेंना मिळाल्यास विजय निश्चित आहे", असा विश्वासही यावेळी संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
राजकीय भूकंप होणार : पुढं ते म्हणाले की, "सध्या अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. दोन-तीन दिवसात अनेक राजकीय भूकंप होतील. संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षात प्रवेश करणार की नाही ते ठरेल. मात्र, विरोधी पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी आमच्या संपर्कात आहे", असंही शिरसाट यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -