मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीसंदर्भात IANS-Matrize चा सर्व्हे समोर आलाय. या सर्व्हेतून महायुतीला राज्यात चांगलं यश मिळेल असं दिसून येतय. यावरच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच यावेळी त्यांनी अमित शाहांवरही निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : "महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील. कोणी कुठलाही सर्व्हे करू द्या. चुकीच्या मार्गानं भाजपाचे लोक ज्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करतील, तिथं आमचे कार्यकर्ते यंदा जास्त सावध आहेत. चंद्रचूड, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या कृपेनं जे सरकार आता बसलंय, ते पुन्हा निवडून येणार नाहीत. याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंचही पुढं सरकत नाही. भाजपानं त्यांच्या पोस्टरवरुन बाळासाहेबांचा फोटो काढावा. कारण, त्यांनीच बाळासाहेबांचा पक्ष फोडला आणि माणसं विकत घेतली", अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केलीय.
अमित शाह फायद्यासाठी खोट बोलतात : पुढं संजय राऊत म्हणाले, "अमित शाह नावाचे व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतात. महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्र ओरबडण्यासाठी, मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून अमित शाह कारस्थान रचताय. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर झालाय. मुख्यमंत्री कोण होणार? हे अमित शाह ठरवणार नाही. तर ते राज्याची जनता ठरवेल. अमित शाहांनी 40 आमदार विकत घेतलेत. मात्र, त्यांनी राज्यातील 14 कोटी जनता विकत घेतलेली नाही. जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये पोलीस, ईडी, सीबीआय आहे, तोपर्यंत ते या देशात दहशत निर्माण करू शकतात. पण राज्याचं नेतृत्व कोण करेल, हे जनताच ठरवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लाम राष्ट्रांमध्ये जाऊन मुस्लिम टोपी घालतात. निवडणुका जिंकण्यासाठी ते मुस्लिम टोपी राज्यात आणताय", असा आरोपही यावेळी राऊतांनी केला.
सर्व्हेत नेमकं काय म्हटलंय? : 'आयएएनएस मॅट्रीझ'च्या सर्व्हेनुसार, राज्यातील 288 मतदारसंघांचा आढावा घेतल्यास महायुतीची बाजू भक्कम दिसत आहे. महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 145 ते 165 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उबाठा) यांना 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
हेही वाचा -