मुंबई Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्पातील मतदान जवळ येत आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपांचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीत तीन ते चार जागांचा प्रश्न सुटलेला नाही. तर महायुतीत आठ-नऊ जागांचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन एकीकडं काँग्रेसचा दावा कायम आहे. तोच दुसरीकडं शिवसेना (ठाकरे गट) या ठिकाणी उमेदवारी जाहीर करुन प्रचारालाही सुरुवात केली आहे. आजपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तीन दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय.
काँग्रेस नेतृत्वानं कार्यकर्त्यांची समजूत काढावी : सांगलीची जागी ही मागील अनेक वर्षापासून काँग्रेसकडे होती. मात्र मविआत ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं सांगलीतील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "कोल्हापूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ या दोन जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या आहेत. तिथं आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता. तिथं मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी, आमच्या पक्षाचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत आम्ही काढली. सांगलीच्या जागेवरुन जर काँग्रेसमध्ये कोणी नाराज असेल किंवा कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांची समजूत काँग्रेस नेतृत्त्वानं काढावी. मला खात्री आहे, काँग्रेसचं नेतृत्व सांगलीत आणि राज्यात कोणी नाराज असतील तर त्यांची नक्कीच ते समजूत काढतील. त्यांचं ते कर्तव्य आहे."
काय आहे काँग्रेसची भूमिका : "सांगलीच्या जागेवरुन दोन्ही पक्षानं हा विषय वाढविण्याची गरज नाही. दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. ती जागा कुणाची हा विषय नाही. सांगलीची जागा सुरुवातीपासून काँग्रेसची होती. ठाकरे गटाकडून दावा सांगताना आम्ही कोल्हापूर आणि रामटेकची जागा सोडली, असं सांगितलं आहे. मात्र आता सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही ताणून घ्यायचं नाही. जो निर्णय हायकंमाड घेईल. त्या निर्णयाला मान्य राहून सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतील," असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
काँग्रेस प्रचारात उतरणार नाही ? : एकीकडं सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात वाद सुरू आहे. अशातच ठाकरे गटानं या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलांना उमेदवारी देऊन प्रचाराला सुरुवात केलीय. राऊत हे महाविकास आघाडी मधील नेते आणि पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणार आहे. ते चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार आहेत. मात्र या प्रचाराला काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जाणार नाहीत. प्रचारात उतरणार नसल्याचं काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी सांगितलंय.
हेही वाचा :