छत्रपती संभाजीनगर Sanjay Raut : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलंय. "राज ठाकरे उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या मनातील संवेदना आणि खंत मला अधिक माहिती आहे. मोदी आणि शाह यांचं काढलेलं व्यंगचित्रं मला आवडलं. त्यात भावना होती, म्हणून टाकलं. राज ठाकरे यांनी पुलवामा येथील घटनेवर भाष्य केलं. त्यात त्यांनी पुलवामा हत्याकांड आधी राष्ट्रीय सल्लागार आणि पाकिस्तान सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली. नंतर हल्ला झाला का? असा प्रश्न उपस्थित केला होता", असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केलीय.
शाहू महाराजांची घेणार भेट : पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले, "छत्रपती शाहू महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानं कोल्हापूरमध्ये जाऊन मोठ्या महाराजांना भेटणार आहोत. त्यानंतर सांगली इथं जाऊन वसंतदादा यांना श्रद्धांजली वाहून मिरजमध्ये जाणार आहोत. आमचे दौरे सुरू आहेत. आम्ही थांबणार नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या सभा होतील. त्या निमित्तानं आम्ही शरद पवार यांची भेट घेणार आहोत. वंचितनं सोबत यावं तसचं राजू शेट्टी यांनी सोबत यावं अशी इच्छा आहे. चर्चाही झाली आहे. मोठे महाराज अपक्ष लढणार नाहीत. ते आदरणीय आहेत. म्हणून उद्धव ठाकरे भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊ."
प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत : वंचितच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले, "वंचित नेहमी कोडी टाकतात. प्रकाश आंबेडकर यांचा कायम सन्मान करतो. आमच्यात लढण्याची हिंमत आहे. प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधान नष्ट करु पाहणाऱ्यांबरोबर जाणार नाहीत. तसंच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात कुठलाही वाद नाही. प्रत्येकाला लढण्याची इच्छा असते. सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. दानवे यांच्याकडे सर्वात मोठं पद आहे. ते सरकारवर तुटून पडत आहेत. त्यामुळं कुठलाही संभ्रम नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही 25 वर्ष भाजपासोबत होतो. पण आता कोणताही स्वाभिमानी माणूस त्यांच्यासोबत जाणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक घटक ईडी आणि सीबीआयला घाबरुन सोबत येत नाहीत", असं देखील राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा :