मुंबई - खासदार संजय राऊत म्हणाले की, "ब्रिटिश सरकारच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांचा दिल्लीमध्ये दरबार भरायचा. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि समस्या ब्रिटिश सरकारसुद्धा ऐकून घेत होते. मात्र, आता शेतकरी, कष्टकरी आणि कामगार मागासलेले घटक हे दिल्लीत जाऊ शकत नाहीत. शेतकरी हे दिल्ली दरबारी आपले प्रश्न मांडू शकत नाही. कारण जर ते दिल्लीत गेले तर त्यांना हुकूमशाही पद्धतीनं अडवलं जात आहे. हुकूमशाही पद्धतीनं शेतकऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत. ही मोदींची गॅरंटी नाही, तर शेतकऱ्यांचे डेंथ वॉरंट काढले जात आहे, असा हल्लाबोल खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
राजधानी ही भाजपाच्या मालकीची आहे का? "महात्मा फुले यांनी ब्रिटिशांच्या दरबारी जाऊनच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. पण, आता कोणीही दिल्लीला जाऊ शकत नाही. तुमचे प्रश्न दिल्लीला जाऊन मांडता येत नाहीत. राजधानी दिल्ली ही भाजपाच्या मालकीची आहे का?" असा सवाल ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. "मागील दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची कोणती आश्वासनं पूर्ण केली ती सांगा? देशात मोदी सरकार आल्यानंतर आत्महत्या थांबतील असं मोदींनी म्हटलं होतं. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत."
मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी तयार केलेले ५ प्रकल्प दाखवावे. उलट शेतकऱ्यांवर ३ काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला. भाजपाला देणग्या देणाऱ्या बड्या उद्योगपतींच्या घशात शेतकऱ्यांच्या जमिनी घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून झाला-खासदार संजय राऊत
६ मार्चला मविआ-वंचित यांच्यात बैठक- "महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची ६ मार्च रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होईल. देशातील संविधान आणि लोकशाही वाचली पाहिजे, अशी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे. मात्र, मोदींचा प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला विरोध आहे. त्यामुळे मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील विचारधारा वेगवेगळ्या आहेत. वाढणाऱ्या हुकूमशाही आणि एकाधिकारशाहीला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली.
आंबेडकर मायावतीसारखे वागणार नाहीत- पुढे बोलताना राऊत म्हणाले की, " मायावती या भाजपाच्या 'बी' टीम असल्याचा ठपका बसला आहे. त्या छुप्या पद्धतीनं भाजपाला मदत करतात. त्यामुळे त्या मागासवर्गीय समाजाची मायावती फसवणूक करतात. परंतु प्रकाश आंबेडकर तसे वागणार नाहीत. कारण प्रकाश आंबेडकरांवर मागासवर्गीयांचा विश्वास आहे. मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकर पुढाकार घेत आहेत. ते भाजपाला पाठिंबा देतील, असं मला बिल्कुल वाटत नाही," असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
...तर त्यांनी त्या खुर्चीचा अपमान केला- कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे राजीनामा देऊन राजकीय पक्षात प्रवेश करणार आहेत. यावर विचारले असता खासदार राऊत म्हणाले "उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश हे राजीनामा देऊन जर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असतील तर याचा अर्थ तुम्ही खुर्चीवर बसून न्यायदानाचे काम करत नव्हता. तर एका राजकीय पक्षाचे काम करत होता", अशी खोचक टीका खासदार राऊत यांनी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचे नाव न घेता केली.
हेही वाचा-