मुंबई - "देशात लोकसभा निवडणुका होत असताना ईव्हीएमविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीती आहे. देशात लोकांना परिवर्तन हवे आहे. मात्र जरी कुठलेही बटण दाबले तरी ते कमळालाच मत जाणार आहे. हा ईव्हीएमचा घोळ आहे, "असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमवरुन भाजपावर टीकास्त्र सोडलं. " ईव्हीएमविरोधात देशभरातील वकिलांनी आंदोलन केलं आहे. संपूर्ण जगामधून ईव्हीएम मशीनला विरोध होत आहे. देशातही ईव्हीएमच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे ईव्हीएमवर निवडणूक घेऊ नका, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली होती. जर ईव्हीएमवर निवडणूक नाही घेतली तर, याचा फटका आम्हाला बसेल, अशी भीती भाजपाला वाटत आहे. म्हणून ते ईव्हीएमवरच निवडणुका घेत आहेत. ईव्हीएमशिवाय निवडणुका घेण्याची भाजपानं हिंमत दाखवावी," असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला दिलं.
मग आम्ही निवडणूक लढवायची नाही का? "वंचित बहुजन आघाडीसोबत अजूनही आमची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांची भूमिका आहे की, देशातील संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे. आमची चर्चा कुठेही थांबलेली नाही. आम्ही 5 जागांचा वंचितला प्रस्ताव दिला होता. परंतु तो त्यांना मान्य नसल्याने त्यानी स्वबळावर लढण्याची जाहीर केलं आहे. त्यांनी काही उमेदवारांची घोषणा केली. मात्र आमच्याकडून अद्यापपर्यंत चर्चा सुरू आहेत. वंचितनं महाविकास आघाडीत यावे, अशी सर्वांचीच आमची इच्छा आहे. परंतु, वंचित आमच्यासोबत येत नाही. मग, आम्ही देशात निवडणूक लढवायच्या नाहीत का?" असा सवाल यावेळी खासदार राऊत यांनी उपस्थित केला.
गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंदच- नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे नाराज आहेत. ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले, "त्यांना आम्हीच निवडून दिलेले आहे. जे गद्दार आहेत, त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच नाही. कारण त्यांनी शिवसेनेबरोबर एकदा गद्दारी करून गेलेले आहेत. अशा गद्दारांना शिवसेनेचे दार बंदच असेल. शिवसेनेतून गद्दारी करून पुन्हा जर असे गद्दार शिवसेनेत येणार असतील तर निष्ठावंत, स्वाभिमानी आणि प्रामाणिक शिवसैनिक आणि जनता यांचा अपमान होईल, असं संजय राऊत म्हणाले. "गद्दारांना शिवसेनेची दारं बंदच असणार आहेत. शिंदे गटात नाराजी वाढत आहे. अनेक बंड तुम्हाला दिसतील. शिंदेंचाही पत्ता कट झालेला तुम्हाला दिसेल," असा टोलाही यावेळी संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
उन्मेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश? भाजपाचे नेते तथा विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापल्यामुळे ते नाराज असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. यावर खासदार संजय राऊत म्हणाले, "उन्मेश पाटील यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. बाकी त्यांचा पक्षप्रवेश होईल किंवा नाही याबाबत आताच काही सांगता येणार नाही," अशी माहिती राऊत यांनी दिली. " सध्या शिंदे गट गुलाम झालेला आहे. भाजपाच्या फेकलेल्या तुकड्यावरच त्यांना जगावं लागत आहे," असा टोला यावेळी राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला.
पंतप्रधानांना जनतेचा आक्रोश कधी दिसणार? "सध्याचे पंतप्रधान हे कार्यवाहक पंतप्रधान आहेत. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान संपूर्ण देशात फिरत आहेत. मात्र अरुणाचल प्रदेशमध्ये आणि लडाखमध्ये चीनने घुसखोरी केलेली आहे. त्याकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाहीय. तुम्ही मणिपुरात जा. लडाखमध्ये जा. अरुणाचल प्रदेशमध्ये जा. बघा, तिथे लोकांचा कसा आक्रोश आहे. लोकं कसे जगत आहेत? तिथे पंतप्रधानांनी जाऊन लोकांच्या समस्या आणि प्रश्न समजून घ्यावे," असं म्हणत खासदार राऊतांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.