मुंबई Sanjay Raut News : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याआधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते. माझ्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे दिल्लीला मौलवीच्या वेशात जायचे. त्यांना दाढी आहेच. पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीत गेले होते," असा दावा ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. अजित पवार आणि अमित शाह यांच्या गुप्त बैठकीवर टीका करत संजय राऊतांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना आपण दिल्लीला नाव बदलून आणि वेषांतर करून कसं गेलो होतो, याबद्दल किस्सा सांगितला होता. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, "अजित पवार दिल्लीला नाव बदलून आले. त्यामुळं त्यांचं बोर्डींग जप्त केलं पाहिजे. अजित पवारांनी त्यांच्या नाट्यकलेची माहिती दिली. परंतु, असं कोणी वेषांतर आणि नाव बदलून गेलं तर हा राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ आहे. तसंच दहशतवादी यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात", अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली. पुढं ते म्हणाले, "शिंदे-फडणवीस-पवार वेष बदलून दिल्लीला जातात. या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे. सामान्य माणूस विमानतळावरून जात असताना त्याची कसून चौकशी केली जाते. परंतु, या लोकांची कोणतीही चौकशी न करता यांना विमानतळावरुन कसं येऊ दिलं गेलं? हा खरा सवाल आहे", असंही ते म्हणाले.
बारामतीचे नवीन विष्णुदास भावे : पुढं ते म्हणाले, "अजित पवारांनी नाव आणि वेष बदलला तर त्यांची ओळख काय होती? यावरुन विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळं माझी मागणी आहे की, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. अजित पवार यांनी स्वत: आपल्या नाट्यकलेची माहिती दिली. महाराष्ट्राला रंगभूमीची मोठी परंपरा आहे. विष्णुदास भावे यांनी रंगभूमीची स्थापना केली. परंतु आता अजित पवार यांना बारामतीचे नवीन विष्णुदास भावे म्हणावं लागेल", असा टोला त्यांनी लगावला. "यासर्व गोष्टींसाठी देशाचे गृहमंत्री जबाबदार आहेत. यांच्या सरकारच्या काळात किती अतिरेकी देशात नाव बदलून आणि वेश बदलून आले असतील माहित नाही. दाऊद इब्राहिम, टायगर मेनन आणि हे उद्योगपती देशाचं कर्ज बुडवून बाहेर गेलेत. तेदेखील येऊन गेले असतील," अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली.
गुन्हा दाखल झाला पाहिजे : "एकनाथ शिंदे हे स्वतःला आनंद दिघेंचे शिष्य मानत असले तरी, त्यांनी मौलवीच्या वेषात जाऊन दिल्लीवारी केलीय. या तिघांनी वेषांतर करून प्रवास करताना जी कागदपत्रं वापरली होती, ती जप्त करावीत. तसंच राष्ट्रीय सुरक्षेच्या अंतर्गत यांची चौकशी करून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे," अशी मागणीही संजय राऊत यांनी यावेळी केली.
हेही वाचा -