मुंबई - उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाविकास आघाडीवरील टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. "कोण नकली, कोण असली हे ठरवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह कोण आहेत? जनता मतपेटीच्या माध्यमातून असली-नकलीचा फैसला करेल," असे ते म्हणाले आहेत.
नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही केली- खासदार संजय राऊत म्हणाले की," असली कोण आणि नकली कोण? हे अमित शाह ठरवू शकत नाही. तुमच्या हातामध्ये पैसा व सत्ता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग व आमच्या विधानसभा अध्यक्षांना हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा आहे, हे ठरवणार असाल तर जनता ते सहन करणार नाही. या नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत. त्यांना भेटण्यासाठी आणि नाक रगडण्यासाठी आपण स्वतः अनेकदा त्याच उद्धव ठाकरे, त्याच शिवसेना आणि त्याच मातोश्रीवर आला होतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला पाठिंबा द्या, हे सांगण्यासाठी तुम्ही स्वतः आला होता. तेव्हा ती खरी शिवसेना होती. आजही खरी शिवसेना आहे."
गैरमार्गाने संसद ताब्यात घेतली- "तुम्ही नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केली आहे. परंतु उद्धव ठाकरे यांची असली शिवसेना आणि शरद पवार यांची असली राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही. तसेच मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही. हा रशिया नाही. इथे पुतीनशाही चालणार नाही. भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असणार हे मोदी, अमित शाह ठरवणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून मतांच्या माध्यमातून ते जनता ठरविणार आहे. नरेंद्र मोदी यांनी गैरमार्गाने संसद ताब्यात घेतली," असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
पायाखालची वाळू सरकत आहे- संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांबद्दल केलेल्या विधानाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की,संजय मंडलिक वारसदार आहेत का? त्यांचे वडील शाहू महाराजांच्या फार जवळचे होते. व शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिव मंडलिक राजकारणात काम करत होते. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची गादी आहे त्याविषयी आम्हाला नेहमीच आदर व श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे पाहिल्यावर तुम्ही महाराष्ट्रातील श्रद्धा स्थानावर ज्या पद्धतीने चिखलफेक करत आहात. हे लक्षण बरं नाही. राजकीय स्वार्थासाठी संजय मंडलिक यांनी ही भाषा वापरली आहे हे महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही.
महायुतीने मुंबईतील १ जागा जिंकून दाखवावी- संजय राऊत पुढे म्हणाले की," कोल्हापूर, हातकणंगले व कोकणामध्ये भाजपा आणि मिंदे गटाच्या लोकांनी धमकी सत्र सुरू केलं आहे. व दाखविण्यात येणाऱ्या आमिषाची निवडणूक आयोगानं दखल घ्यायला हवी. तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता काटेकोरपणे लावत आहात. दुसरीकडं सत्ताधारी पक्षाची लोक सरपंचांना धमक्या देतात. मतदारांना आमिष दाखवतात, हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे. तसेच मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत. माझं उघड आव्हान आहे. महायुतीनं त्यातील एक जागा जिंकून दाखवावी. त्याचप्रमाणे वर्षा गायकवाड कुठेही नाराज नाहीत," असेही खासदार राऊत म्हणाले.
यांच्या हातात आता काही नाही-उद्धव ठाकरे यांची आज पालघरमध्ये त्यांचे उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी पहिली प्रचार सभा आहे. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की," आज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पालघरमधील उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी जाहीर सभा घेत आहेत. या सभेसाठी संपूर्ण महाविकास आघाडी, डावे पक्ष, आदिवासी संघटना या सर्वांची उपस्थिती असणार आहे. पालघरमध्ये भारती कामडी यांचा जोरात प्रचार सुरू आहे. परंतु समोरचा उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप सांशकता आहे. शिवसेना सोडून जे मिंदे गटात गेले ते विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेना सोडून कमळावर निवडणूक लढवायची आहे. अशी परिस्थिती आहे. अद्याप ठाण्याचा उमेदवार ठरला नाही. कल्याणमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. यांचे सर्व उमेदवार दिल्लीतून घोषित होत आहेत. यांच्या हातात आता काही राहिलेलं नाही," असा टोलादेखील संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा-