मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी संपन्न होणार आहे. यासाठी होणाऱ्या मतदानाच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री भाजपाचे नारायण राणे (Narayan Rane) आणि महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यात लढत होणार आहे. नारायण राणे यांच्यासाठी घेतलेल्या सभेतून विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांची नाव न घेता 'नकली मोदी भक्त' म्हणत निशाणा साधला आहे.
राज ठाकरे नकली अंधभक्त? : नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवलीत सभा पार पडली. बाकावर बसणारा खासदार हवा की, केंद्रात मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार हवा असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत यांच्यावर टिका केली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, शनिवारी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे सुद्धा कोकणात होते. प्रकल्पना विरोध का होत आहे. हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातले चांगले प्रकल्प गुजरातला पळवायचे. रोजगार, महसूल देणारे, महाराष्ट्र घडवणारे प्रकल्प हे राज ठाकरे यांच्या प्रिय मोदी-शहा यांनी गुजरातला पळवले आणि महाराष्ट्राचा विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारले. आमच्या शेत जमिनीचं नुकसान करायचं आणि त्याला विरोध केल्यावर कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची. सध्या हे जे नवीन मोदी आणि शाहांचे भक्त झाले आहेत ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? हे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. कोकणातल्या अनेक प्रमुख नेत्यांचा त्यांनी अपमान केलाय. काही मोदींचे अंधभक्त मध्येच जागे होतात, पण हे नकली अंधभक्त असतात, असं म्हणत राज ठाकरे यांचं नाव ना घेता त्यांनी टोला लगवला.
कोणते दिवे लावले : संजय राऊत यांनी भाजपाचे नारायण राणे यांच्यावर देखील निशाणा साधला. तुम्हाला बाक बडवणारे खासदार हवे आहेत का? अजित पवार देखील सुप्रिया सुळे यांच्या विषयी हेच बोलतात. तुम्हाला बाक बडवणारे खासदार हवे आहेत की, मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे हवे आहेत, असा सवाल राऊत यांनी उपस्थिती केलाय. कोकणासाठी नारायण राणे यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काय दिवे लावले, कोकणासाठी त्याचा खुलासा वकिली करणाऱ्यांनी करायला हवा असा खोचक टोला, राऊत यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला आहे.
महाराष्ट्राचे प्रकल्प पळवून नेले : बॅरिस्टर नाथ पै जे कोकणातले अत्यंत नामवंत असे वक्ते आणि खासदार होते. लोचटगिरी करून 10 पक्षांतर करून मंत्रीपद भोगण हा विकास आहे का? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. बाक बडवणाऱ्या खासदारांनी हा देश आणि लोकशाही वाचवली आहे. बाक बडवणाऱ्या 140 खासदारांना मोदींनी निलंबित केलं आहे हे त्यांना माहिती आहे का?, हे जे मौनी खासदारांचा समर्थन करत आहेत मनसेचे प्रमुख ही त्यांची मजबुरी असल्याचंही ते म्हणाले.
राणे कोकणात पराभूत होत आहे : कोकणला फार मोठी परंपरा आहे. ती परंपरा विनायक राऊत पुढे नेत आहेत. राणे यांच्या बोलण्याकडं फार दखल घ्यायची गरज नाही. राणे कोकणात पराभूत होत आहेत. पराभूत होताना त्यांचा हा जो काही कावा चाललेला आहे तो चार जूनला कळेल. कोकणच्या खासदारांचा शनिवारी अपमान केला ते मी बोललो आणि जे विनाशकारी प्रकल्पाचा समर्थन करत आहेत त्याच्याविषयी बोललो. खरं म्हणजे मोदी शाह यांनी महाराष्ट्राचे जे प्रकल्प पळवून नेले त्याच्यावरती नारायण राणे यांनी एकदा तरी तोंड उघडलं का? असा थेट सवाल राऊत यांनी नारायण राणे यांना विचारला आहे. मुंबईतले प्रकल्प नेले, महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प नेले, महाराष्ट्राची लूट चालू आहे. त्याच्यावरती राज ठाकरे, नारायण राणे या दोघांनी एकदा तरी तोंड उघडलं का? हे स्पष्ट करावं असं आवाहन, राऊत यांनी दोघांना केलंय.
हेही वाचा -
- "पक्ष चिन्हासारखं आमचं ग्राउंडही चोरीला गेलं, पण जनतेने निवडणूक...", रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
- ईशान्य मुंबईत संजय पाटील नावाचे 4 डमी उमेदवार, मतदारांना संभ्रमित करण्याचं हे षडयंत्र असल्याचा संजय पाटील यांचा आरोप - North East Mumbai Lok Sabha
- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस, कोल्हापुरात प्रचाराचा 'सुपर संडे' - Lok Sabha Election 2024