मुंबई Sanjay Raut On Kirit Somaiya : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची खिचडी घोटाळ्या प्रकरणी आज (30 जानेवारी) ईडीकडून चौकशी होत आहे. यानिमित्तानं या विषयावर बोलताना संजय राऊत यांनी हा घोटाळा उघड करणारे भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर हल्लाबोल करत एक प्रकारे त्यांना धमकी वजा इशारा दिला आहे.
ईडीची पातळी घसरली : संजय राऊत यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, "खिचडी घोटाळ्याचे सर्व लाभार्थी मिंधे (शिंदे) गटामध्ये आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत ईडी दाखवत नाही. ईडीची पातळी इतकी खाली घसरली आहे का? आम्ही अडीच वर्षात कोरोना काळात जे काम केलं ते संपूर्ण जगाने पाहिलं. तसंच शेकडो कोटींचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात, त्यावर तपास यंत्रणा गप्प बसतात. विक्रांत बचाव प्रकरणाचे कोट्यवधी पैसे जमा केले त्याचं काय झालं? माझ्याकडं त्याबाबत पुरावे आहेत. ते मी कोर्टात दिले, परंतु त्यांनी कोर्ट मॅनेज केलंय. मात्र, खालच्या कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर बाप आणि मुलगा (किरीट आणि नील सोमैया) फरार झाले. मग फडणवीस सरकार आले आणि त्यांनी तो गुन्हाच रद्द केला."
आमचा पण बॉस बसलाय : पुढं किरीट सोमैयांवर टीका करत संजय राऊत म्हणाले की, "किरीट सोमैयाला उलटा टांगून मारू, याची लायकी आहे का? परंतु आमचा सुद्धा बॉस बसलाय. तो सागर बंगल्यामध्ये नाही पण कुठेतरी बसला आहे. तो ईश्वर आहे. आम्ही कुठल्या पक्षात जाणार नाही, आम्ही घाबरणार नाही. किती काळ आणि कुणाकुणाला त्रास द्याल? आमचा पक्ष फोडून झाला. आता कारवाया करताय पण आम्ही घाबरत नाही. "
इतर घोटाळ्यांवर चुप्पी का : "किरीट सोमैयांविरोधात तक्रार द्यायला आता 5 महिला समोर आल्या आहेत. पण अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण आम्ही करू नये असं आम्हाला वाटतं. त्यांनाही बायको आणि सून आहे आणि हे आमच्यावर कारवाया करतायत. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर चालले यावर बोला, 8 हजार कोटींच्या ॲम्बुलन्स घोटाळ्यावर बोला, 500 कोटींच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यावर बोला. अजित पवारांचा 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा, हसन मुश्रीफांच्या घोटाळ्यावर बोला. वर्षा आणि देवगिरी बंगल्यावर खिचडी घोटाळ्यातील लाभार्थ्यांचे केटरिंग चालू असून शिंदे गटातील एका खासदाराची त्याच्या बरोबर पार्टनरशिप आहे. मुलुंडच्या पोपटलालची त्यावर बोलण्याची हिंमत आहे का? आमच्यामध्ये वार झेलण्याची हिंमत आहे. अबकी बार चारसो पार असे ते म्हणतात, पण त्यांना दोसो पार पण करता येणार नाहीत", असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा -