मुंबई Sanjay Raut News - जयदीप आपटे यांना मदत करणाऱ्या खऱ्या सूत्रदारांना कधी अटक करणार? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सोबतच या सर्व प्रकरणामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचा हात असल्याचा गंभीर आरोपदेखील खासदार राऊत यांनी केला.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले , "जयदीप आपटेसारखा एक माणूस इतके दिवस गायब होता. तो कल्याणमध्येच सापडतो. मी वारंवार म्हणत होतो जयदीप आपटेच्या मागे शक्ती आहे. ती शक्ती मंत्रालयात, वर्षा बंगल्यावर आणि मालवणात आहे. त्याच्यामुळे इतके दिवस जयदीप आपटे हे पोलिसांना चुकवू शकले. पण, अखेर शिवभक्त यांचा दबाव आणि रोष होता की त्याला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात या राज्यात जे घडलं ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. जयदीप आपटे याच्यापेक्षा त्याला बेकायदेशीर काम देणारे सूत्रधार आजही सरकारमध्ये आहेत. त्यांच्यावरती कारवाई कधी होणार? जयदीप आपटेला अटक होण्याआधी सिंधुदुर्ग कोर्टामध्ये त्याच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू होती. त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हालत होते. मी वारंवार ठाण्याच्या उल्लेख करत आहे."
या संपूर्ण कामात भ्रष्टाचार झालेला आहे. आमचा विरोध आणि लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. पुतळ्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयाचे टेंडर काढलं. प्रत्यक्ष काम 20-25 लाखात केले-खासदार, संजय राऊत
पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, " जयदीप आपटे दोन दिवसात सरेंडर होतील. आधी त्यांच्या जामीनाबाबत हालचाली सुरू करा, असे आदेश होते. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बाजार मांडला. हे एक षड्यंत्र आहे. त्याचे सूत्रधार ठाण्यामध्ये आहेत. आम्ही राजकारण करू इच्छित नाही. लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न कोणालातरी पाठीशी घालण्यासाठी झाला."
पुतळा कोसळण्याचा काय आहे वाद? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महायुतीच्या नेत्यांनी वाऱ्याच्या वेगामुळे पुतळा कोसळल्याचा दावा केला होता. मात्र, ही घटना भ्रष्टाचारामुळे झाल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. महाराष्ट्र कला संचालनालयाच्या संचालकांनीही केवळ सहा फुटांचा पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिल्याचं म्हटलं होते. मात्र, राजकोटमध्ये 35 फुटांचा पुतळा उभारण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागितली.
जयदीप आपटेला त्याच्या घरातून अटक केली. याचा अर्थ तो स्वतः समोर आला, पोलिसांना सापडला नाही. हा निष्कर्ष निघू शकतो. असो!त्याला असलेल्या वरदहस्तामुळे तो सापडायला इतका वेळ लागला का? हा प्रश्न आहेच.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2024
- काँग्रेसची टीका-काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत आपटेच्या अटकेवरून पोलिसांसह सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "जयदीप आपटेला त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. याचा अर्थ तो स्वत:हून पुढे आला होता. तो पोलिसांना सापडला नाही. कोणाच्या आशीर्वादामुळे त्याला शोधण्याकरिता इतके दिवस लागले?
हेही वाचा-