पुणे Sanjay Kakde on Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही. राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसून भारतीय जनता पक्ष राज्यात लोकसभेच्या 35 जागा लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) यांना एक आकडी जागा देणार असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत भाजपाचे नेते संजय काकडे यांना विचारलं असता ते म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत एकच खासदार असून पक्षश्रेष्ठी त्यांना योग्य न्याय देतील आणि त्यांना चांगल्या जागा देणार असून अजित पवार यांचं मुख्य लक्ष्य हे विधानसभा असून पुढं विधानसभेला युती झाल्यास त्यांना चांगल्या जागा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिका परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काकडे यांनी आपली भूमिका मांडली.
अजित पवार नाराज नाही : अजित पवार नाराज असून ते दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. याबाबत काकडे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "अजित पवार हे जरी अमित शाह यांच्याबरोबर बैठकीला जात असले तरी ते नाराज नाहीत. त्यांची जी मागणी असेल ती अमित शाह यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. तिथं जो काही निर्णय होईल तो संपूर्ण राज्याला मान्य होणार आहे." आज भाजपा कार्यकर्त्यांकडून मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय. याबाबत काकडे म्हणाले की, "भाजपात निवडणुका आल्या ही अशा छोट्या गोष्टी होत असतात. आमचा पक्ष हा शिस्तबध्द पक्ष असून अशा कुठल्याही बॅनरला पक्ष भीक घालेल असं वाटत नाही. एखाद्या छोट्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांकडून तसेच विरोधकांकडून देखील अशा पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आली असेल."
महायुती 45 जागा जिंकेल : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत दिल्लीतील कोअर कमिटी निर्णय घेईल. राज्यातील तसंच भाजपाची दुसरी यादी ही येत्या 15 ते 20 तारखेपर्यंत जाहीर होणार असल्याचं यावेळी काकडे म्हणाले. मी स्वतः इच्छुक असून मी पक्षश्रेष्ठींना तसं कळवल्याचं म्हणत त्यांनी निवडणूक लढवण्याच्या शक्यतांना पूर्णविराम दिलाय. तसंच पुण्यात भाजपाचा उमेदवार जिंकून येइल. राज्यात आमच्या सर्वेनुसार महायुती 45 जागा जिंकणार असल्याचं काकडेंनी सांगितलं.
हेही वाचा :