संगमनेर : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपाचे माजी खासदार सुजय विखेंच्या (Sujay Vikhe) चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, असं असतानाच संगमनेरची जागा शिवसेनेच्या वाटेला गेल्यानं विधानसभा निवडणूक लढवण्याचं सुजय विखे यांचं स्वप्न भंगलंय.
काय म्हणाले सुजय विखे? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुजय विखे म्हणाले की, "संगमनेरची जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र, ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. नगर जिल्ह्यातील कोणती जागा कोणाला जाईल यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. महाराष्ट्रात 8 ते 10 जागा शेवटच्या टप्प्यात उरल्या होत्या. या जागांविषी वरच्या स्तरावर वाटाघाटी झाल्या. त्यानंतर संगमनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यात आली."
मॅनेज न होणारा उमेदवार : पुढं ते म्हणाले, "शिवसेनेकडून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की, मागील पाच वर्षात त्यांनी सर्वसामान्य जनतेची अनेक कामे केलीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार आम्ही या जागेवरुन दिलाय. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा काय करून दाखवू शकतो? हे आता 23 तारखेलाच कळेल", असं सुजय विखे म्हणाले.
सभेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरुन झाला होता वाद : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी (25 ऑक्टोबर) सुजय विखे यांची सभा झाली. या सभेदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी जाळपोळच्या घटनाही घडल्या. या प्रकरणावरुन महायुतीवरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. असं असतानाच आता संगमनेरची जागा शिवसेनेला देण्यात आलीय. त्यामुळं वक्तव्यामुळं जिल्ह्यात तापलेल्या वातावरणाला शांत करण्यासाठी महायुतीकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा -