उज्जैन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजाविधी केल्यामुळं नवा वाद निर्माण झालाय. महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यावर गेल्या वर्षभरापासून बंदी घालण्यात आलीय. परंतु तरीदेखील खासदार श्रीकांत यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळं त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर महाकाल मंदिर प्रशासनानं एका अधिकाऱ्याला पदावरुन हटवलंय.
अधिकाऱ्याची हकालपट्टी : खासदार श्रीकांत शिंदे यांना गाभाऱ्या प्रवेश दिल्यानं काँग्रेसनं मध्य प्रदेशातील भाजपा सरकारवर टीका केली होती. मंदिराचे प्रशासक गणेश धाकड यांनी शनिवारी (19 ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितलं की, "दर्शन व्यवस्था प्रभारी विनोद चौकसे यांना निष्काळजी दाखविल्याच्या आरोपावरून पदावरून हटवण्यात आलंय. तसंच तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे." तसंच अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक निर्देश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
नेमकं काय आहे प्रकरण? : उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये गाभाऱ्यातील व्यवस्थापन आणि शिवलिंगाचा अभिषेक आदी गोष्टींची जबाबदारी असणारे पुजारी दिसत आहेत. परंतु, त्याचबरोबर गाभाऱ्यात इतर काही व्यक्तीही दिसत आहेत. यामध्ये श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीदेखील दिसत आहेत. यावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला. सामान्य भक्तांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास बंदी असताना उच्चपदस्थ नेतेमंडळींना प्रवेश कसा दिला जातो?", असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय.
विरोधकांची टीका : या प्रकरणावरुन टीका करत काँग्रेसचे आमदार महेश परमार म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असोत किंवा भाजपाचे इतर मंत्री नेतेमंडळी असोत, हे सर्व दादागिरी करून गाभाऱ्यात जातात. मला वाटतं की हे राजेशाहीत जगत आहेत. लोक 50 फूट लांबून महाकालचे दर्शन घेतात. त्यामुळं मला वाटतंय कि 100 वर्षांपूर्वीच्या राजेशाहीत हे जगत आहेत.” दरम्यान, महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळं हा प्रकार कसा घडला? याची चौकशी करण्याचे निर्देश उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी दिले आहेत.
हेही वाचा -
- "महाराष्ट्रात पुन्हा आपलंच सरकार येणार..." खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाम विश्वास
- वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरुन श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना फटकारलं; काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? - Waqf Amendment Bill
- मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षातील नेते आग्रही - Shrikant Shinde should get cabinet