पुणे Rohit Pawar On Sharad Pawar Health : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजच्या सर्वच सभा आणि कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. गेल्या 20 दिवसांपासून पवार प्रचाराच्या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करत होते. तर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात त्यांनी जाहीर सभांमधून जनतेला संबोधित केलं. त्यामुळं, त्यांचा घसा बसला असून प्रकृती अस्वास्थेमुळं त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आलाय. असं असतानाच आता त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचं शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी शरद पवारांची प्रकृती बिघडण्यामागचं कारणही स्पष्ट केलंय.
काय म्हणाले रोहित पवार? : यासंदर्भात आज (6 मे) पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रोहित पवार म्हणाले की, "गेल्या 20 दिवसांमध्ये शरद पवार यांनी 55 सभा घेतल्या. निवडणुकांच्या धामधुमीत ते फक्त 4 तास झोपायचे. या वयात अशी दगदग करू नका, असं अनेकांनी सांगितलं. पण त्यांनी कुणाच ऐकलं नाही. डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस आराम करण्याचा सल्ला दिलाय. तसंच आता त्यांची तब्येत चांगली आहे, पण त्यांचे फोन सतत सुरू आहेl. आजारी असताना देखील ते प्रत्येक मतदार संघातून अपडेट घेताय", असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं.
...त्यामुळं मी भावनिक झालो : रविवारी (5 मे) बारामती लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या सभेत बोलत असताना रोहित पवार भावूक झाले होते. यावरुन अजित पवार यांनी त्यांची मिमिक्री केली. यासंदर्भात विचारण्यात आलं असता रोहित पवार म्हणाले की, "मी कालच्या सभेत जे काही बोललो ते अगदी मनापासून बोललो. त्यावेळी मी मतं मिळतील की नाही याचा विचार केला नाही. अजित पवार गटाकडून नेहमी शरद पवारांचं वय काढलं जातं. तसंच ही पवारांची शेवटची सभा असल्याची वक्तव्य केली जातात. हे सगळं ऐकून खरंच वाईट वाटतं, आणि त्यामुळंच मी भावनिक झालो होतो", असं रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा -
- "त्यांना ताठ मानेनं किमान ५० पावलं चालण्याची शक्ती लाभो..." शरद पवारांच्या प्रकृतीवरून टिंगल करणाऱ्यांना प्रशांत जगतापांचा टोला - sharad pawar
- "शरद पवारांनी आयुष्यभर..."; राहुल नार्वेकर यांची टीका - Lok Sabha Election 2024
- धर्मावर आधारित आरक्षणाचं विधान करून समाजातील तणाव वाढविण्याचा प्रयत्न-शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका - Sharad Pawar