अमरावती Ravi Rana Vs Bacchu Kadu: : अमरावती लोकसभा मतदारसंघात आजचा दिवस हा राजकीय दंगलीचा दिवस ठरण्याची शक्यता आहे. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे आपले प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्यासाठी जिल्हा स्टेडियम येथून नेहरू मैदान येथे मिरवणूक काढणार असून, बच्चू कडू यांनी या मिरवणुकीसाठी आधीच आरक्षित केलेल्या 'सायन्स कोर' मैदान (Science Core Ground) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्या सभेसाठी बळजबरीनं बळकावल्यामुळं राणा आणि बच्चू कडू यांच्यात मोठा वाद आज अमरावतीत रंगणार अशी शक्यता आहे.
जिल्हा स्टेडियमवर बच्चू कडू समर्थकांची गर्दी : भाजपाकडून दडपशाही पद्धतीनं आपण आरक्षित केलेली जागा हडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळं आमदार बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा स्टेडियम येथून आमदार बच्चू कडू मिरवणूक काढणार असून सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हा स्टेडियम येथे मतदार संघातील विविध भागातून कडू यांच्या समर्थकांची गर्दी उसळायला लागली आहे. दुपारी एक ते दोनच्या सुमारास जिल्हा स्टेडियम येथून नेहरू मैदानपर्यंत ही पदयात्रा काढणार आहेत. इर्विन, चौक मालवीय चौक, चित्रा चौक, जव्हार गेट, गांधी चौक मार्गे ते नेहरू मैदानपर्यंत बच्चू कडू यांची पदयात्रा निघणार आहे. नेहरू मैदान येथे आमदार बच्चू कडू हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
अमित शहांच्या सभेसाठी देखील अमरावतीत गर्दी : भाजपाचे नेते अमित शाह हे अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सायन्स कोर मैदान येथे दुपारी तीन वाजता सभा घेणार आहेत. अमित शाह यांना ऐकण्यासाठी अमरावती मतदारसंघातील सर्वच भागातून भाजपा समर्थक मोठ्या संख्येनं अमरावती शहरात दाखल झाले असून सायन्स मैदान येथे प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून त्यांना मैदानात सोडण्यात येत आहे. स्वतः आमदार रवी राणा हे सकाळपासूनच 'सायन्स कोर' मैदान परिसरात उपस्थित असून या ठिकाणी कुठलीही गडबड होऊ नये यासाठी लक्ष ठेवून आहेत.
शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : 'सायन्स कोर' मैदानाच्या आरक्षणावरून आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी दिवसभर प्रचंड वाद घातला. रात्री अकरा वाजेपर्यंत बच्चू कडू हे सायन्स कोर मैदान परिसरात हजारो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानाऐवजी जिल्हा प्रशासनानं ठरवून दिलेल्या क्रीडा संकुल येथून आपली मिरवणूक काढणार असले तरी प्रहार कार्यकर्त्यांचा रोख पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण शहरावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सायन्स कोर मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुल परिसरात देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय.
हेही वाचा -
- नवनीत राणांविरोधात शेतकरी आक्रमक; फलक पाहायला चला म्हणत घोषणाबाजी, खासदारांनी घेतला 'काढाता पाय' - Farmer Aggressive On Navneet Rana
- अमरावतीत 'जंग ऐ मैदान'; अमित शाहांच्या सभेवरुन बच्चू कडू आक्रमक; भाजपावर हल्लाबोल - Amravati Lok Sabha Election 2024
- नवनीत राणांविरोधात उद्धव ठाकरेंनी थोपाटले दंड; म्हणाले, 'बदला घेणारच' - Lok Sabha Election 2024