जळगाव/नवी दिल्ली Raksha Khadse : जळगावच्या राजकारणात नेहमीचा खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिलाय. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांचा पराभव केलाय. यामुळं मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात रक्षा खडसेंना आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालीय. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोथळी गावच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिलीय. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी मध्यंतरी भाजपा सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तरीही रक्षा या भाजपाबरोबर एकनिष्ठ राहिल्या आणि त्याचंच त्यांना आता फळ मिळालंय.
उच्चशिक्षित खासदार रक्षा खडसे : खासदार रक्षा खडसे यांचा जन्म 13 मे 1987 रोजी झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. मात्र यानंतर काही वर्षांनी त्यांचे पती निखिल खडसे यांचं अपघाती निधन झालं. खरतर रक्षा खडसेंसाठी ही मानसिक आघात करणारी घटना होती. परंतु, यातून त्यांनी स्वतःला सावरत आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यात झोकून दिलं. रक्षा खडसे या उच्चशिक्षित असून संगणकशास्त्रातील पदवीधर आणि मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी या चार भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे.
सरपंच ते केंद्रीय मंत्री : 2010 पासून राजकारणात सक्रिय असलेल्या रक्षा खडसे यांनी कोथळी गावच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्या काही काळ जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या. 2014 लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून त्या पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. तेव्हा 16 व्या लोकसभेत वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी निवडून गेलेल्या रक्षा खडसे या सर्वांत तरुण खासदारांपैकी एक होत्या. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षानं पुन्हा रक्षा यांच्यावर आणि मतदारांनी रक्षा यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना संसदेत पाठवलं.
एकनाथ खडसेंचं राजकीय वजन वाढणार : विशेष म्हणजे रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा नेहमीच मोठा वाटा राहिलाय. त्यांनी रक्षांना राजकारणात पूर्ण स्वातंत्र्य दिलं. एकनाथ खडसे मध्यंतरी विरोधी पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही या दोघांच्या नातेसंबंधात कधी अंतर पडलं नाही. याउलट 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून रक्षा खडसेंना उमेदवारी निश्चित होताच एकनाथ खडसे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत रक्षा यांच्या प्रचारात झोकून दिलं. तेव्हाचं त्यांनी आपण पुन्हा भाजपात परतणार असल्याचंही जाहीर केलं होतं. आता रक्षा खडसे या केंद्रात मंत्री झाल्यानं एकनाथ खडसेंचं राजकीय वजन पुन्हा वाढणार आहे, हे मात्र निश्चित!
हेही वाचा :