मुंबई : सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी शनिवारी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री श्री. राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. राजेंद्रजी… pic.twitter.com/Sqxwuj3WaA
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 19, 2024
तुतारीसोबत जाण्याचा आग्रह : गेल्या काही काळापासून शिंगणे हे शरद पवारांकडं परत येतील, अशी चर्चा होती. राजकारणात आल्यावर १९९२ पासून शरद पवारांसोबत काम करत आहे. अपक्ष आमदार म्हणून १९९५ मध्ये निवडून आल्यानंतरही पवारांसोबतच राहिलो होतो. मात्र, मध्यंतरी बँकेला वाचवण्यासाठी अजित पवारांसोबत जावं लागल्याची कबुली यावेळी शिंगणे यांनी दिली. शिंगणे यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर अजित पवारांनी देखील शिंगणे यांच्याशी संवाद साधला होता. मात्र, कार्यकर्त्यांचा देखील तुतारीसोबत जाण्याचा आग्रह असल्याची माहिती, शिंगणे यांनी यापूर्वी दिली होती.
जिल्हा बॅंक वाचवण्यासाठी त्यावेळी अजित पवारांसोबत गेलो. मात्र, आता महाराष्ट्राला वाचवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं शरद पवारांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. - राजेंद्र शिंगणे, आमदार
गायत्री शिंगणे अपक्ष लढणार : राजेंद्र शिंगणे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घरवापसी झाल्यानं त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी मात्र बंडाचा झेंडा हाती घेण्याचा निर्धार केलाय. सिंदखेडराजा मतदारसंघात शिंगणे विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार गायत्री शिंगणे यांनी केला आहे. त्यामुळं तिथंही शिंगणे विरुद्ध शिंगणे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील व पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश… pic.twitter.com/ILcAgV71kq
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 19, 2024
जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा : शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संसदीय समितीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासहित नेतेमंडळी उपस्थित होती. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा -