मुंबई Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोअर कमिटीची आज वांद्रे येथील एमआयजी क्लब इथं बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. सध्या राज्यातील सर्व 288 विधानसभा जागांचं सर्वेक्षण मनसेकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत 88 जागांचं सर्वेक्षण अहवाल आले आहेत. या जागांसाठी संभाव्य उमेदवारांची नावंही निश्चित करण्यात येत आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची ही महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मनसे पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली असून, महायुतीत किती जागा मागायच्या? यासाठी मनसे 288 जागांची चाचपणी करत आहे. तसंच युती तुटल्यास कोणत्या जागा लढायच्या यावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
जुलैच्या मध्यात महाराष्ट्र दौरा सुरु करणार : कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "आज आमच्या पक्षाची बैठक होती. या बैठकीत निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येकाला विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही कार्यक्रम पत्रिका यांना देण्यात आलेल्या आहेत ती पूर्ण झाल्यावर आमची पुन्हा एक बैठक होईल. या बैठकीनंतर जुलै महिन्याच्या मध्यात मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरु करत आहे. त्यावेळी पुन्हा आपली सर्वांची भेट होईलच."
रशिया युक्रेन युद्धाचा विधानसभेत प्रचार करणार : शेतकरी आत्महत्या, दुष्काळ असे अनेक प्रश्न विधानसभा निवडणुकीत चर्चेला येतील. मनसे नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, "रशिया आणि युक्रेन युद्धाचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रचार करीन असं मला वाटतं. काय प्रश्न विचारता? महाराष्ट्राच्या निवडणुकीत मी महाराष्ट्राच्या प्रश्नांवरच बोलणार ना, इतर नेते कोणत्या विषयांवर बोलतात याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. जातीपातीच्या राजकारणात लोक मतदान करतात हे आता इथल्या नेत्यांना कळलं आहे. त्यामुळं ते त्याचं राजकारण करत आहेत. मात्र, आता लोकांनी देखील ओळखायला हवं."
तर राज्यात जातीच्या नावावर रक्तपात सुरु होईल : राज्यात सध्या आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असं सामाजिक वातावरण निर्माण झालं आहे. अशातच सोशल मीडियावर एका शालेय विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल होत असून, हे जातीपातीचं वादळ आता शाळेपर्यंत देखील आल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "ओबीसी आणि मराठा यांच्यात ज्याप्रमाणे द्वेष वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. जातीपातीच्या राजकारणात मतं मिळतात, म्हणूनच हे लोक पुढं नेत आहेत. जातीच्या आधारावर मतांची विभागणी होते. मी पाहिलं की आता राज्यातील शाळकरी मुलंही जातीबद्दल बोलू लागली आहेत. राज्यात जाती-धर्माच्या नावाखाली विष पसरवलं जात आहे. त्याचा फायदा राजकीय लोकांनाही झाला, त्यामुळंच विष पसरवत आहेत. हे असंच सुरु राहीलं तर उत्तर प्रदेश, बिहारसारख्या घटना राज्यात घडू लागतील, जातीच्या नावावर रक्तपात सुरू होईल", अशी भीती देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :