मुंबई/नाशिक : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही. राज ठाकरे यांच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच दिले आहेत. यावरुन आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना महायुतीत घेण्याबाबत भाष्य केलंय.
राज ठाकरे यांनी प्रासंगिकता गमावली : "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रासंगिकता गमावली आहे. त्यामुळं सत्ताधारी महायुतीला त्यांची गरज नाही," असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही मुंबईतील माहीम मतदारसंघातून पराभव झाला.
राज ठाकरेंच्या स्वप्नांचा चुराडा झाला : नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "राज ठाकरेंना आपल्याशिवाय सत्तेत येणं शक्य नाही, असं वाटत होतं. मात्र, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. महायुतीत राज ठाकरेंना स्थान नाही." रामदास आठवले यांच्या या विधानानंतर मनसे काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. दरम्यान, मनसे आणि भाजपाची विचारधारा जवळपास सारखीच आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना सोबत घेण्याबाबत विचार केला जाईल, असं म्हणत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच मनसेला सोबत घेण्याबाबत थेट संकेत दिले होते.
महाविकास आघाडीवर साधला निशाणा : "ईव्हीएम मशीन तर याच लोकांनी आणली. आता पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या की नाही हे निवडणूक आयोग ठरवेल. विरोधकांनी लोकशाहीचा अपमान करू नये. महाविकास आघाडीनं आता पराभव मान्य करावा," असा टोमणाही रामदास आठवले यांनी लगावला.
हेही वाचा -