मुंबई : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शनिवारी 7 डिसेंबरला पहिल्या दिवशी विरोधकांनी ईव्हीएम मतदानात घोळ असल्याचा आरोप करत शपथविधीवर बहिष्कार घातला. परंतु महाविकास आघाडीचा सहयोगी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी आणि रईस शेख यांनी शनिवारीच आमदारकीची शपथ घेतली. शपथ आणि ठाकरेंचं हिंदुत्व या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतून समाजवादी पक्ष बाहेर पडला. त्यानंतर समाजवादी पक्ष हा भाजपाची बी टीम असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. तर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आदित्य ठाकरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. "लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जी मतं मिळाली, ती कुठली होती ते अगोदर बघा, सर्व धर्मांचा सन्मान करा." असं रईस शेख म्हणाले.
आमचं हिंदुत्व हे हाताला काम आणि हृदयात राम : महाविकास आघाडीच्या आमदारांनी शनिवारी 7 डिसेंबरला शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातलेला असताना समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी शपथ घेतल्यामुळे महाविकास आघाडीत समाजवादी पक्षावरून अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती. विशेष म्हणजे, समाजवादी पक्षाच्या या कृत्यावर शिवसेना (उबाठा) पक्ष मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "यूपीमध्ये समाजवादी पक्ष अखिलेश यादव चालवतात. तिथे ते इंडिया आघाडीचं चांगलं नेतृत्व करत आहेत. परंतु, महाराष्ट्रामध्ये समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहे. आमची भूमिका अत्यंत स्पष्ट असून, आमचे हिंदुत्व हे हाताला काम आणि हृदयात राम अशा प्रकारचं आहे. आमचा एकमेव असा पक्ष आहे जो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं ठामपणे सांगतो."
आदित्य ठाकरेंचा आरोप चुकीचा : आदित्य ठाकरे यांनी समाजवादी पक्षावर केलेल्या टीकेला रईस शेख यांनी प्रत्युत्तर दिलं. "संविधानाचं संरक्षण आपल्याला करायचं आहे. परंतु, धर्मनिरपेक्षतेबाबत आपली काय भूमिका आहे? ती महायुतीनं स्पष्ट करावी. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये धर्मनिरपेक्षतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. धर्मनिरपेक्षतेबाबत तुमचं काय मत आहे? तुमची पुढची भूमिका काय आहे? हे आदित्य ठाकरे यांनी अगोदर स्पष्ट करायला हवं. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जी मतं मिळाली, ती कुठली होती ते अगोदर बघा, सर्व धर्मांचा सन्मान करा. आदित्य ठाकरे यांनी आमच्यावर जो आरोप केलाय, तो आम्हाला मान्य नाही. याबाबत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील," असं रईस शेख म्हणाले.
हेही वाचा