मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभेच्या अध्यक्षांनाच असतात, असा निर्वाळा विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यापूर्वीचे निकाल, संविधानातील तरतुदी यांचा विचार करुन विधानसभा अध्यक्ष अशा मुद्द्यांवर निर्णय देत असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपण अद्याप अध्यक्ष झालेलो नाही, मात्र विधानसभेचे अध्यक्षपद मिळाल्यावर जेव्हा हे प्रकरण माझ्या समोर येईल, तेव्हा त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असंही नार्वेकर म्हणाले.
अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता बाकी : विधानसभेच्या अध्यक्षपदी अर्ज भरण्याची मुदत रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत होती, रविवारी केवळ भाजपाचे कुलाबाचे आमदार राहुल नार्वेकर यांचाच अर्ज दाखल करण्यात आला. सोमवारी विधानसभेत अध्यक्षपदाबाबत औपचारिक घोषणा करण्यात येईल, राहुल नार्वेकर यांच्या बिनविरोध अध्यक्षपदी निवडीची आता केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. अर्ज भरल्यानंतर नार्वेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "विधानसभा अध्यक्ष हे संविधानिक पद आहे, राज्यातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 288 आमदारांना न्याय देण्याचा मी या माध्यमातून पूर्ण प्रयत्न करणार आहे."
सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विश्वास ठेवला यानिमित्त नार्वेकर यांनी सर्व वरिष्ठांचे आभार मानले. पुन्हा अध्यक्ष बनण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भाजपा 'पार्टी विथ डिफरन्स' आहे. त्यामुळं पदाची जबाबदारी देताना केवळ वयाला, अनुभवाला महत्त्व न देता, तरुणांच्या गुणवत्तेला महत्त्व दिलं जातं. अध्यक्षपदी काम करताना सर्वांची साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
लोकसभेवेळी ईव्हीएमला विरोध केला नाही : ईव्हीएमविरोधात आंदोलनाबाबत बोलताना नार्वेकर म्हणाले की, "लोकशाहीवर विश्वास नसल्यानं आंदोलन होतं. लोकसभेवेळी ईव्हीएमला विरोध केला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत विरोधात निकाल आल्यानं ईव्हीएमवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ईव्हीएमला विरोध करताना जनतेने दिलेल्या जनादेशावर टीका होणार नाही, त्याचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. माझ्याविरोधात देखील विरोधकांनी आरोप केले. मात्र, माझ्या निकालात त्यांना त्रुटी मिळाल्या नाहीत."
हेही वाचा -