पुणे Lok Sabha Elections 2024 : देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार असून यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. पुणे लोकसभा मतदार संघासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपा तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस अशी लढत होणार आहे. पूर्वीपासून काँग्रेसचा गड असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघावर 2014 पासून भाजपाचा झेंडा फडकत आहे. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसची पुणे लोकसभेवरची पकड निसटल्यानंतर आता मतदार संघात महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय.
मतदार संघ आणि आमदार : पुणे लोकसभा मतदार संघात कसबा, शिवाजीनगर, कोथरूड, वडगांव शेरी, पर्वती, पुणे कँटोन्मेंट असे 6 मतदार संघ आहेत. कसबा मतदार संघात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर तर शिवाजीनगर मतदार संघात भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत. कोथरूड मतदार संघात भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील तर वडगांव शेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. तसंच पर्वती येथे भाजपाच्या माधुरी मिसाळ आणि पुणे कँटोन्मेट मतदार संघात भाजपाचे सुनील कांबळे हे आमदार आहेत. खडकवासला येथे भाजपाचे भीमराव तापकीर आणि हडपसर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत.
- मतदार संघाची आकडेवारी : पुणे लोकसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एकूण 18 लाख 6 हजार 953 मतदार असून यात 9 लाख 34 हजार 194 पुरूष मतदार तर महिला मतदार हे 8 लाख 72 हजार 759 आहेत.
विधानसभा निहाय मतदार :
- कसबा मतदार संघात 2 लाख 72 हजार 747 मतदार आहे (पुरुष-135215, महिला- 137502, तृतीयपंथी-30)
- पुणे कँटोन्मेंट मतदार संघात 269588 एवढे मतदार आहे (पुरुष- 137922, महिला- 131638, तृतीयपंथी- 28)
- पर्वती मतदार संघात 334136 एवढे मतदार आहेत. (पुरुष- 171299, महिला- 162749, तृतीयपंथी- 88)
- कोथरूड मतदार संघात 401419 एवढे मतदार आहेत. (पुरुष- 210571, महिला- 190828, तृतीयपंथी- 20)
- शिवाजीनगर मतदार संघात 272798 एवढे मतदार आहे. (पुरुष- 138514, महिला- 134243, तृतीयपंथी- 41)
- वडगांव शेरी मतदार संघात एकूण 452628 मतदार आहेत. (पुरुष- 235322, महिला- 217205, तृतीयपंथी- 101)
कोण आहे खासदार : पुणे लोकसभा मतदारसंघात 2019 साली भाजपाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत एकूण 49 टक्के मतदान झालं होतं. यामध्ये गिरीश बापट यांना 632835 तर मोहन जोशी यांना 308207 एवढी मते मिळाली होती. त्यानंतर जवळपास 4 वर्ष खासदार गिरीश बापट यांनी खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 29 मार्च 2023 ला दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं. यानंतर पोटनिवडणूक झाली नसल्यानं सद्यस्थितीला इथं कोणीही खासदार नाही.
- कधी काँग्रेस तर कधी भाजपाचा गड : पुणे लोकसभा मतदारसंघाला पूर्वीपासूनच काँग्रेसचे गड समजल्या जायचं. 1952 ते 2014 पर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे 10 खासदार निवडून आले आहे. मात्र, 2014 ला भाजपाकडून अनिल शिरोळे तर 2019 ला भाजपकडून खासदार गिरीश बापट हे विजयी झाले. यामुळं सद्यस्थितीला पुणे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय.
इच्छुक उमेदवार कोण? : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सुनील देवधर तसंच दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट हे इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संगीता तिवारी यांसह 22 जण इच्छुक आहे. तसंच लोकसभेसाठी मनसेनंदेखील जोरदार तयारी केली असून मनसेकडून शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे, पक्षाचे नेते बाबू वागस्कर हे इच्छुक आहे.
इच्छुकांकडून जोरदार तयारी : देशात लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून पुणे शहरात इच्छुकांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजपाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विविध कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा घेण्यात येत आहे. तर माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून बागेश्र्वर धाम तसंच विविध महाराजांना बोलावून शहरात धार्मिक कार्यक्रम, मॅरेथॉन आरोग्य शिबिर घेतल्या जातं आहे. भाजपाचे सुनील देवधर हे मंडळांच्या गाठीभेटी घेत आहे. दुसरीकडं काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी हे वेकअप सारखे कार्यक्रम घेत आहेत. तर कसबा मतदार संघात विजयी झालेले आमदार रविंद्र धंगेकर हे पुणेकरांना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बदलतं समीकरण : पुण्यात सद्यस्थितीला महापालिकेत प्रशासकीय राज्य असलं तरी यापूर्वी भाजपाकडे महापालिकेची सत्ता होती. तर आठपैकी 5 विधानसभा मतदार संघात पक्षाचे आमदार आहे. शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी मधून बंड पुकारत अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानं पुण्यात भाजपाची ताकद वाढल्याचं बोललं जातंय. पण दुसरीकडं विरोधकांनी इंडिया आघाडी केल्यानं काँग्रेसच्या उमेदवाराला महाविकास आघाडीसह आप, वंचित, तसंच इतर छोट्या संघटनांची मदत होणार असल्यानं यंदाच्या निवडणुकीत बाजी पलटण्याची शक्यता आहे.
बदलतं समीकरण : भाजपाकडून गेल्या काही महिन्यांपासून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. असे असतानाच नुकतंच राज्यसभेसाठी भाजपानं कोथरूडमधून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली. कसबा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाज पक्षावर नाराज असल्यानं पक्षाने कुलकर्णी यांना उमेदवारी दिली असल्याचं सांगितलं जातंय. कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं मोहोळ यांच्या ऐवजी आत्ता मुळीक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पण जरी या दोघांची जोरदार चर्चा असली तरी पक्षाकडून या इच्छुक उमेदवारांव्यतिरिक्त नवीन चेहरा समोर आणलं जाणार असल्याचंदेखील बोललं जातंय
- काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका : पुणे शहर काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात गटबाजी पाहायला मिळत आहे. माजी आमदार मोहन जोशी यांचा एक गट तर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा दुसर गट पाहायला मिळत आहे. अशातच कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा अकेला चलोसारखं पुढं जात आहे.
हेही वाचा -