मुंबई Pravin Darekar On Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यात सध्या मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दाढी, मिशी काढल्या तर ते गणपत पाटील सारखे दिसतील, असं प्रवीण दरेकर यांचे मित्र त्यांना म्हणाले होते, असा टोला दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही दरेकर यांना प्रतिउत्तर दिलं आहे. "दरेकर यांनी कपाळावर कुंकू लावले तर, ते अतिशय सुंदर सखू सारखे दिसतील", असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. यावरून आता पुन्हा दरेकरांनी मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे. मुंबईत ते बोलत होते.
तुम्हाला सत्तेची आस लागली आहे : प्रवीण दरेकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्यावरील विश्वास उडालेला आहे. मराठा समाजाला निवडणुकीचा कसा फायदा होईल याचा आढावा घेण्याचं काम जरांगे पाटील करत आहेत. "जरांगे यांच्या नौटंकीला महाराष्ट्रातील मराठा समाज आता भुलणार नाही". तसंच, माझ्यावर कोणी बोलायचं नाही. बोलल्यावर त्याला टार्गेट करायचं हे मनोज जरांगे पाटलांचं काम आता चालणार नाही. हे मराठा आंदोलन आता मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही. तुम्हाला सत्तेची आस लागली आहे. तुम्ही यासाठी सुपारी घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं का? हे शरद पवार, नाना पटोले यांनी स्पष्ट करावं." असंही ते म्हणाले.
आंदोलनाचा जनतेला किळस आलाय : दरेकर पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या भावनांचा जो काही खेळ मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला आहे. तो त्यांच्या राजकीय दुकानदारीसाठी आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. बोलताना बोलायचं मला सत्तेचं काही पडलेलं नाही. मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार या गोष्टी कशाला करायच्या. वर दुसरीकडं म्हणायचं मला राजकारणात इंटरेस्ट नाही. या आंदोलनाचा आता जनतेला किळस आलेला आहे. मराठा समाजाच्या लोकांनाही आता या आंदोलनाचं दुःख होत आहे, कारण त्यांच्या भावनांचा बाजार सुरू आहे. तसंच या आंदोलनामागे कोण आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. आंदोलनाला कोण फूस देत आहे. जरांगेची भाषा ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळं त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण ती चालवत आहे हे सुद्धा आता स्पष्ट झालं आहे. जरांगे पाटील यांची इच्छा आहे की, त्यांना जेलमध्ये टाकावं. कारण त्यांची पब्लिसिटी आता कमी झाली आहे. म्हणून आता पुन्हा पब्लिसिटी मिळवण्यासाठी त्यांना जेलमध्ये जायची इच्छा आहे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.
हेही वाचा -