मुंबई Political Reaction on Jiretop : राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) चे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज जसा जिरेटोप घालत होते तसा जिरेटोप पंतप्रधान मोदी यांना घातला. यामुळं छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्याची भावना काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केली असली तरी महाराष्ट्र पेटून उठत नाही अशी खंत इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केलीय.
अपमान झाल्याची जनमानसात भावना : प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जसा घालत होते तसा जिरेटोप अर्पण केला. पंतप्रधान मोदींनी सुद्धा तो जिरेटोप परिधान केला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखा जिरेटोप अशा पद्धतीनं अर्पण करणे आणि एखाद्या व्यक्तीने तो परिधान करणे या दोन्ही बाबी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आहेत. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान करणाऱ्या आहेत अशी भावना जनमानसामध्ये पाहायला मिळतेय.
महाराष्ट्र पेटून उठत नाही ही खंत : या संदर्भात बोलताना इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रामध्ये पुन्हा-पुन्हा होत आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख म्हणजे त्यांची भवानी तलवार आणि त्यांच्या डोक्यावर असलेला जिरेटोप ही आहे. छत्रपती शिवरायांचा जिरेटोप हा केवळ त्यांनीच परिधान केलाय. त्यापूर्वीसुद्धा कोणीही जिरेटोप परिधान केला नव्हता आणि अगदी त्यांच्या वारसांनीही छत्रपती शिवरायांचा जिरेटोप परिधान केला नाही. त्यामुळं छत्रपती शिवरायांचा जिरेटोप कोणालाही परिधान करणं हे अयोग्यच आहे. त्यातही तो ज्या व्यक्तीनं दिलाय, ती एक व्यावसायिक आहे. त्यांना छत्रपतींच्या अस्मितेशी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांशी काहीही देणं घेणं नाही. इतकं होऊनसुद्धा महाराष्ट्रातील जनता पेटून उठली नाही आणि या अपमानाबद्दल तीव्रतेनं व्यक्त झाली नाही ही अजून एक खंत आहे." तसंच महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मिता बोथट झाल्या आहेत का, असा सवाल यानिमित्तानं निर्माण होत आहे. यापूर्वी अनेक लोकांनी विविध टोप्या, पगड्या परिधान केल्या आहेत. मात्र, त्यांना कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही. त्या त्या प्रदेशातील वस्त्र प्रकार एवढंच त्याचं महत्त्व असतं. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या या अपमानाची त्यांनी माफी मागावी, असंही सावंत यांनी म्हटलंय.
मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला : यासंदर्भात बोलताना शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी हे नेहमीच महाराष्ट्राचा अपमान करत आले आहेत. छत्रपती शिवरायांचा जिरेटोप परिधान करुन त्यांनी पुन्हा एकदा महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केलाय." तसंच मोदींनी ज्या व्यक्तीचा दाऊदशी संबंध असल्याचं म्हटलं, इकबाल मिरची याच्याशी संबंध जोडला, त्याच व्यक्तीकडून त्यांनी शिवाजी महाराजांचा जिरेटोप कसा स्वीकारला असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्र हा अपमान कधीही सहन करणार नाही असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिलाय.
पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. पण या दैवताचा सातत्यानं अपमान केला जातोय. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भापजा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेकांनी महाराजांचा अपमान केला. पण भारतीय जनता पक्षानं त्यावर चकार शब्द काढला नाही. अयोध्यातील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातही श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती, असे प्रकार शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आहेत, त्याला आळा घातला पाहिजे. पण त्यात भरच पडत आहे."तसंच अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीसोबत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी झाली होती. देशद्रोह्याशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलचे पापी हात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपला लागले हे लाजिरवाणे आहे. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करतो, असंही नाना पटोले म्हणाले.
भाजपाचा प्रतिक्रीयेस नकार : या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.
हेही वाचा :