मुंबई Prakash Ambedkar News : गेल्या दोन महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे युतीसंदर्भात सातत्यानं महाविकास आघाडीसोबत चर्चा करत होते. महाविकास आघाडी सोबत आपण जाण्यास इच्छुक आहोत तसंच भारतीय जनता पार्टी सारख्या शक्तींचा पराभव करणं हे आपलं उद्दिष्ट आहे असल्याचं ते सातत्यानं म्हणत होते. मात्र, असं असतानाच आता जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानं आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. तर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर पुन्हा एकदा त्यांनी भाजपाची बी टीम म्हणून काम सुरू केलंय, अशी चर्चा होऊ शकते, म्हणून प्रकाश आंबेडकर आता नवी खेळी खेळत असल्याचं राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी म्हटलंय.
प्रकाश आंबेडकरांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न : महाविकास आघाडी बरोबर जागा वाटपाची बोलणी पुढं जात नाहीत, तसंच शिवसेने सोबतचीही युती आपण तोडत आहोत असं जवळपास आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपली चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे यांना आपण जाहीर पाठिंबा दिलाच आहे. शिवाय ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी ही चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात निश्चित अद्याप काही सांगू शकत नाही येत्या 27 तारखेला या संदर्भातील माहिती मी पत्रकार परिषदेद्वारे देईन, असं आंबेडकर म्हणाले. त्यामुळं आंबेडकर यांनी आता प्रकाश शेंडगे आणि मनोज जरांगे यांच्यासोबत राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू केला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
...हा प्रयत्न शक्य नाही : आंबेडकर यांच्या या प्रयत्नासंदर्भात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, ओबीसी अभ्यासक आणि नेते श्रावण देवरे या संदर्भात म्हणाले की, मनोज जरांगे यांनी जाहीरपणे ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळं ओबीसी समाज हा मनोज जरांगे यांच्यावर नाराज आहे. प्रकाश आंबेडकर हे मनोज जरांगे यांचे जाहीर कौतुक करतात आणि त्यांना पाठिंबाही देतात. या पार्श्वभूमीवर जर प्रकाश शेंडगे त्यांच्यासोबत गेले तर ओबीसी समाज हा प्रकाश शेंडगे यांनाही मदत करणार नाही. त्यामुळं प्रकाश शेंडगे आणि मनोज जरांगे एकत्र आणण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न शक्य होणार नाही. आंबेडकरांना जरांगे यांच्या संदर्भात जी भूमिका घ्यायची ते घेऊ शकतात. मात्र, ओबीसी त्यांना निश्चित मदत करणार नाही", असं देवरे म्हणाले.
तिसऱ्या आघाडीला भविष्य नाही : यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही नेहमीच संशयास्पद राहिली आहे. त्यांनी महाविकास आघाडीबरोबर आतापर्यंत चर्चा सुरू ठेवली आणि आता ते महाविकास आघाडी सोबत जाणार नाही असं म्हणताय. जर त्यांनी पुन्हा एकदा स्वतंत्रपणे लढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडीला अप्रत्यक्षरीत्या फटका देण्याचा प्रयत्न आंबेडकरांच्या या कृतीतून दिसतो. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची दोन्ही संघटनांना सोबत घेण्याची कल्पना चांगली आहे. मात्र, ती प्रत्यक्षात उतरेल असं चिन्ह नाही. कारण, मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात प्रकाश शेंडगे यांनी टोकाच्या विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळं ते दोघे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे."
हेही वाचा -
- ठरलं! 'वंचित'चा स्वबळाचा नारा; प्रकाश आंबेडकर 'या' तारखेला भरणार अकोलामधून उमेदवारी अर्ज - Prakash Ambedkar
- बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिला, संभाजीराजेंनी मानले आभार - Lok Sabha elections
- 'वंचित'चा काँग्रेसला सात जागांवर पाठिंब्याचा प्रस्ताव, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षावरून विश्वास उडाला; आंबेडकरांचं खर्गेंना पत्र