ठाणे PM Narendra Modi On Congress : नेहरूंच्या काळापासून २०१४ पर्यंत कॉंग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब...गरीब... अशी माळ जपली जात असून, गरीबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला आहे. देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या शहजादेंविरोधात नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनं तोंडाला कुलूप आणि डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अशी जोरदार टीका केली.
मुस्लिमांना आरक्षण देण्याचा डाव : मोदींकडून हिंदू-मुस्लिम वाद केला जात असल्याचा आरोप केला जातोय. पण मोदी हा खेळ खेळणाऱ्यांचा 'कच्चा चिठ्ठा खोल रहा है,' असं सांगत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला आव्हान दिलं. आई-वडिलांची आठवण काढण्यासाठीही कॉंग्रेसवाले अल्बम उघडून पाहतात, अशी कॉंग्रेसची स्थिती आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारला. ओबीसी, दलित आणि आदिवासींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्यासाठी कॉंग्रेसनं कर्नाटक ही प्रयोगशाळा केली आहे. कर्नाटकात सत्ता मिळाल्यावर एका रात्रीत ओबींसीचं आरक्षण मुस्लिमांना दिलं गेलं. देशात अशाच पद्धतीनं मुस्लिमांना आरक्षण दिलं जाण्याचा डाव आहे.`वोट जिहाद' घडवलं जात आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही, याकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधलं. अशा कॉंग्रेसला महाराष्ट्रातील जनता मत देईल का?, असा सवालही त्यांनी केलाय.
विकसित भारत घडविण्यासाठी ब्ल्यू प्रिंट : कॉंग्रेसकडून दहशतवादाचं समर्थन केलं जात असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगणारेही कॉंग्रेसचा कुर्ता धरून उभे आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी नकली शिवसेनेवर केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या महानतेबाबत शहजादेंना पाच वाक्यं बोलण्यास सांगावं, असं आव्हानही नरेंद्र मोदी यांनी दिलं. त्याचबरोबर विकसित भारत घडविण्यासाठी पहिल्या १०० दिवसांत ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. त्यात देशातील युवकांचा सहभाग असावा, यासाठी आणखी २५ दिवसांचा कालावधी वाढवून युवकांना नाविन्यपूर्ण कल्पना पाठविण्याचं आवाहन केलं.
यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा : विकसित भारत घडविण्यासाठी आणि इंडिया आघाडीच्या तुष्टीकरणाविरोधात भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील आणि कल्याणमधून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करावं. या दोघांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींच्याच खात्यात जाईल. कपिल पाटील यांनी मंत्रिमंडळात काम केलं असून, ते विकासासाठी कायम कार्यरत आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या अखेरीस केलं.
महायुतीचा विजय होणार असल्याची दिली ग्वाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीच्या प्रचारात उतरवलं जाऊन, पाकिस्तानच्या घोषणा दिल्या गेल्या. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानं विकासाचा माहौल तयार झाला असल्याचं सांगून महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.
मोदींमुळं अन्न, गॅस, औषधे मोफत : भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे झाली आहेत. भिवंडी-कल्याणवासीयांनी महायुतीला दिलेल्या एका मतानं मेट्रो, स्मार्ट सिटी, मोफत घरे अशी अनेक कामे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं भिवंडी-कल्याणचा कायापालट होत आहे, असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केलं. प्रचारदौऱ्यात फिरताना एका शेतकऱ्यानं मोदींमुळं अन्न, गॅस, औषधे मोफत मिळण्याबरोबरच खात्यात १२ हजार रुपये मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार : ही जनसामान्यांची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. पाच वर्षात देशासाठी एक दिवस देऊन आवर्जून मतदान करून नरेंद्र मोदींना साथ द्यावी, असं आवाहन कपिल पाटील यांनी केलं. तर कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनीही मोदी सरकारमुळं १० वर्षांत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलल्याचं आवर्जून नमूद केलं. कल्याण मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, महेश चौघुले, शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार नरेंद्र पवार यांची भाषणे झाली.
मान्यवरांची उपस्थिती : महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील आणि कल्याणमधील उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान-व्हर्टेक्स येथे पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. लाखोंच्या या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपाचे आमदार गणेश नाईक, किसन कथोरे, शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, कुमार आयलानी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा -
- EXCLUSIVE : या निवडणुकीत जनतेचा मूड काय? पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' उत्तर - PM Modi Interview with Eenadu
- "मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांना विरोध करणाऱ्यांना असं पाडा की...", मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन - Manoj Jarange Patil Appeal
- महायुतीने उमेदवारी नाकारल्याने विनोद पाटील यांची निवडणुकीतून माघार, 'हे' आहे मुख्य कारण - Vinod Patil