बीड : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (15 डिसेंबर) पार पडत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे.
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकत्र : सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात बीड जिल्ह्याला दोन मंत्रिपदं मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर भाजपाकडून पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळाले आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच हे भाऊ-बहीण मंत्रिमंडळात एकत्र दिसणार आहेत. या दोन्ही बहीण भावासह तब्बल 39 मंत्री शपथ घेणार आहेत.
कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?
- राष्ट्रवादी काँग्रेस : धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, संग्राम जगताप, सुलभा खोडके, इंद्रनील नाईक.
- शिवसेना : आमशा पाडवी, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, उदय सामंत, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल.
- भाजपा : पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मंगल प्रभात लोढा, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, जयकुमार रावल, जयकुमार गोरे, पंकज भोयर, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक हे शपथ घेणार आहेत.
शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईतील आझाद मैदान येथे 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडलाय. परंतु त्यानंतर स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर आमदारांचा शपथविधी लांबणीवर गेल्यामुळं महायुतीत समन्वय नसून मतभेद असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. महायुती सरकारचं (16 डिसेंबर) सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 1991 नंतर उपराजधानी नागपुरात पहिल्यांदाच मंत्र्यांचा शपथविधी पार पडत आहे. त्यामुळं या शपथविधीकडं सर्वांचेच लक्ष लागलंय.
हेही वाचा