मुंबई Union Budget 2024 : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत सादर केला. यात केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यासाठी निधींचा पाऊस पाडला आहे. मात्र महाराष्ट्र राज्यासाठी विशेष अशी काही घोषणा न झाल्यामुळं विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ठेंगा दाखवला : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरून राज्यातील आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात आणि देशात महायुतीचं सरकार असून अर्थसंकल्पात ठेंगा दाखवण्यात आलाय. महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर देशाच्या तिजोरीत जातो. मात्र, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरीव असं काही मिळालं नाही तसंच काँग्रेस पक्षाच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्पात असल्याचा दावाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्रातील सरकार शेतकरी विरोधात आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारचा गोडवा गाणाऱ्या महायुतीनं महाराष्ट्रासाठी काय आणलं याचा हिशोब जनतेला द्यावा लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला चकरा मारून जनतेसाठी नाही तर राजकीय फायद्याची गणितं मांडली का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राला भोपळा दिला : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देशातील तिजोरीत सर्वात जास्त धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक दिली जाते. राज्यातून पळवलेले उद्योग आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट यासाठी निधी दिला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र दुर्दैवानं भाजपा सरकारनं आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला आहे.
महाराष्ट्राच्या हातावर तुरी दिल्या : शिवसेना (ठाकरे गट) आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. "हा देशाचा नव्हे तर बिहार आणि आंध्र प्रदेशचा अर्थसंकल्प आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला देशाचा पॉवर हाउस म्हणून संबोधणाऱ्या पंतप्रधानांनी राज्यात त्यांचं सरकार असताना सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर तुरी दिल्या आहेत. 5 ट्रेलियन गोलच्या नावाखाली महाराष्ट्राला केंद्राने गोल-गोल फिरफून लांब फेकलं आहे. इथल्या जनतेनं भाजपाला मतदान केलं नाही, याचा जणू वचपाच आज केंद्रानं काढलेला दिसतोय! राज्यातील राज्यकर्त्या पक्षांचे तिन्ही कर्णधार आज त्यांच्याच लोकांनी शून्यावर बाद केलेले दिसले!" असं अंबादान दानवेंनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंची खोचक टीका : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपा आणि अर्थसंकल्पावर खोचक टीका केली आहे. "भाजपाला सरकार वाचावयचं आहे, म्हणून आंध्र प्रदेश आणि बिहारला जास्त वाटा देण्यात आला, पण यात महाराष्ट्राचा काय दोष? आपण सर्वांत जास्ते करदाते आहोत. आम्ही जे योगदान दिलं त्याबद्दल काय मिळालं? अर्थसंकल्पात एकदाही महाराष्ट्राचा उल्लेख होता का? भाजपा महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करतंय? असंवैधानिकपणे सरकार स्थापन करुन आणि राज्यात सर्वात भ्रष्ट राजवट चालवूनही महाराष्ट्राला त्या बदल्यात काहीच मिळत नाही. शिंदे राजवटीचा भ्रष्टाचार आणि नंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातूनही महाराष्ट्राची ही लूट सुरु आहे" असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा :