नागपूर Nitin Gadkari Speech : नागपूर विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीनं आयोजित केलेल्या 'अमेझिंग विदर्भ, सेंट्रल इंडिया टुरिझम' या परिषदेत बोलत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मिश्किल वक्तव्य केलंय. "सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते विषकन्येसारखंच असतं, ज्याच्यासोबत जाईल त्याला बुडवल्याशिवाय राहणार नाही", असं ते म्हणालेत. गडकरींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी? : यावेळी बोलत असताना नितीन गडकरी म्हणाले की, "व्यावसायिकांनी हे समजून घ्यायला हवं की, सर्वकाही सरकारच्या भरवशावर होत नाही. तर काही वेळेस सरकारला दूर ठेवावं लागतं. तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये पडू नका. जी सबसिडी घ्यायची आहे, ती घ्या. पण ती केव्हा मिळेल याचा काही भरवसा नाही. आता तर लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. त्यामुळं सबसिडीचा निधी त्यांना तिकडंही लागेल", असंही गडकरी मिश्किलपणे म्हणाले.
जागा आहे पण उद्योग येत नाहीत : " विदर्भात मोठे गुंतवणूक आणण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. मात्र, कोणी हाती लागत नाही," अशी खंत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. " विदर्भात 500 किंवा हजार कोटींची गुंतवणूक करायला कोणी तयार नाही. विदर्भात मिहानसारखे प्रकल्प आणले. उद्योजक जमिनी विकत घेतात. मात्र, ते युनिट सुरू करत नाहीत," असेही केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्र्यांनी सांगितलं.
पर्यटन क्षेत्राचा विकास शक्य : पुढं गडकरी म्हणाले की, "नागपूर हे टायगर कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. आसपास पेंच, कऱ्हांडला, ताडोबासारखे व्याघ्र प्रकल्प आहेत. मोठ्या संख्येनं पर्यटक याठिकाणी येतात. या पर्यटकांना नागपुरात थांबविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी चांगले हॉटेल्स, वाहतूक व्यवस्था आदींची गरज आहे. मात्र, ते गुंतवणुकीतूनच शक्य आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणुक झाली तर पर्यटन क्षेत्राचा विकास शक्य आहे", असं मतही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा -
- नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी 'ऑक्सीजन बर्ड पार्क'चं लोकार्पण; काय आहेत वैशिष्ट्य? - Inaugurates Oxygen Bird Park
- "आजच्या राजकारणात विचार..."; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत - Nitin Gadkari
- देशात 'स्मार्ट सिटी' नव्हे तर 'स्मार्ट व्हिलेज'ची गरज; नितीन गडकरींची भूमिका - Nitin Gadkari On Smart Village